वर्धा : अनेक वर्षांपासून झाडगाव (गो.) परिसरात रोही आणि रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरातील शेतशिवार जंगलाला लागून असल्याने पिकांचे या वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान नित्याचे झाले होते. यासाठी शेतीला कंपाऊंड लावून विद्युत प्रवाह द्यावा तर जनावरांना मृत्यू ओढावतो आणि शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढताना कंपाऊंड करंट या उपकरणाचा शोध लागला. आज परिसरातील अनेक शेतकरी या तंत्राचा उपयोग करीत असल्याचे या प्रकल्पाचे निर्माते रत्नाकर अवचट सांगतात. झाडगाव (नि.) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नाकरा अवचट यांचे चन्याचे उभे पीक दोन अडीच वर्षांपूर्वी रोह्याने फस्त केले. यात त्यांचे बरेच नुकसान झाले. आधीपासूनच तांत्रिक वस्तू बनविण्यात त्यांना रस होता. तसेच ग्रामविकास तंत्रनिकेतनच्या अवजार सहाय्य केंद्रातही ते काम करीत असल्याने तो अनुभवही पाठीशी होता. तसेच शेतात विद्यूत प्रवाह खेळता करावा तर जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांनी हलका करंट देणारे व बॅटरीवर चालणारे एक उपकरण विकसित केले. याला त्यांनी कंपाऊंड करंट हे नाव दिले. यात त्यांनी १२ व्होल्टच्या बॅटरीचा उपयोग केला. तसेच कंडेन्सर, इलेक्ट्रॉनिक किट अशा वस्तू वापरून त्यांनी हे यंत्र तयार केले. यासाठी त्यांना जवळपास दोन हजार रुपये खर्च आला. सर्वप्रथम त्यांना आपल्या अडीच एकर शेतातील कंपाऊंडवर याचा प्रयोग करून पाहिला. ते यशस्वी झाले. रोही सारख्या प्राण्यांचा कंपाऊंड तारांना स्पर्श होताच हलकासा विजेचा धक्का लागतो. ज्यामुळे कुठलीही इजा होत नाही, पण रोही दूर पळतात. तसेच एकदा लक्षात आल्यावर पुन्हा प्राणी इकडे फिरकत नसल्याचे अवचट यांनी सांगितले. त्यांचा हा यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडून हे उपकरण आपल्या शेतातील कंपाऊंडवर बसवून घेतले आहे. असुरक्षितता भय आणि अनुकूलता नसेल तर वन्यप्राणी आपला पथमार्ग व जागा बदलतात. या मानसिकतेचा व तत्वाचा उपयोग करून आणि या पासून कोणालाही धोका होणार नाही यांची काळजी घेत आवश्यक ते बदल यात केले आहेत. यामुळे प्राण्यांच्या जीविताला कुठलाही धोका न होता त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण होते.(शहर प्रतिनिधी)
छोट्याशा यंत्राने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण
By admin | Updated: July 21, 2014 00:18 IST