डेंग्यूबाबत जनजागृतीसाठी अॅप : आरोग्य मंत्रालयाचा उपक्रम; शासनानेही घेतला धसका पराग मगर वर्धा डेंग्यू... उपचार होत असला तरी जीवघेणा आजार. औषधोपचारापेक्षा त्यापासून बचावाकरिता सुरक्षा हाच योग्य उपाय असल्याचे शासनाकडून सदैव सांगण्यात आले आहे. जनजागृतीकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी या आजारावर आळा मिळविणे शक्य होत नसल्याचे समोर आले आहे. आज स्मार्ट फोनचे वापरकर्ते शहरासह ग्रामीण भागातही असल्याने शासनाने जनजागृतीकरिता अॅपच तयार केले आहे. ‘इंडिया फाईट्स डेंग्यू’ या नावाने हे अॅप भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाद्वारे तयार केले आहे. यामुळे डेंग्यूपासून सुरक्षा आता तुमच्या हातात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मच्छरांपासून होत असलेल्या आजारांमध्ये डेंग्यू हा अतिशय भयानक आजार. यात मनुष्याच्या जीवितास धोका असतो. केवळ पावसाच्याच नाही तर नागरिकांनी साचवून ठेवलेल्या पाण्यातच या आजाराचा डास तयार होतो. हा डास चावल्यास आजाराची लागण होते. यात वेळीच औषधोपचार मिळाल्यास बरे, अन्यथा यात जीव जाण्याची शक्यता अधिक असते. यावर जनजागृती होत असली तरी आजाराचा प्रसार कायम आहे. यामुळे आजारावर आळा घालण्याकरिता शासनानेही आधुनिकतेची कास पकडल्याचे दिसत आहे. आज प्रत्येकाकडून स्मार्टफोनचा वापर होत आहे. यामुळेच की काय आरोग्य मंत्रालयाद्वारे इंडिया फाईट्स डेंग्यू हे अॅप बनवून संपूर्ण माहिती सरळ, साध्या व सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे. डेंग्यूच्या आजारावर व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. या अॅपची वैशिष्ट्ये एखादा आजार झाल्यास त्याची लक्षणे ओळखून तो कोणता हे ओळखले जाते. त्यामुळे या अॅपमध्ये डेंग्यूची लक्षणे काय याचे तपशीलवार आणि चित्रमय वर्णन दिले आहे. सोबतच हा आजार होऊ नये म्हणून कारावयाच्या उपाययोजना, डेंग्यू आजाराबद्दल जनमानसात असलेले समज-गैरसमज, आजार झाल्यास किंवा त्याची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये याची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. \ रुग्णालयाची माहिती हे अॅप डाऊनलोड करताना जीपीएस प्रणालीसाठी तुमचे नाव, तुमचा युजर आयडी आणि मोबाईल नंबर घेतला जातो. त्यामुळे जर तुम्हाला आजार झाला किंवा एखाद्यास मदत करावयाची असल्यास या जीपीएस प्रणालीद्वारे जवळचे रुग्णालय, रक्तपेढी यांची माहिती तुम्हाला एका क्लिक वर मिळून शकते. आपल्या मनात डेंग्यूबाबत असलेल्या प्रश्नाचे समाधानही या अॅपद्वारे शक्य आहे. काही सूचना द्यावयाच्या असल्यास तीही सोय यात आहे.
‘इंडिया फाईटस् डेंग्यू’द्वारे सुरक्षा तुमच्या हातात
By admin | Updated: August 1, 2016 00:29 IST