सेलू : प्रवाशांना प्रवासादरम्यान वाहनांची प्रतीक्षा करताना उन्ह, पावसापासून बचाव करता यावा, त्यांना निवारा मिळावा म्हणून गावोगावी प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण काही प्रवासी निवारे आंबटशौकिनांचा अड्डा ठरत आहे. प्रवाशांऐवजी वाहनांनाच निवारा देतात, ही स्थिती आहे़ तालुक्यातील या निवाऱ्यांची दुरूस्ती करून प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे झाले आहे़ वर्धा-नागपूर मार्गावर सेलू येथील यशवंत चौकातील प्रवाशी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे़ सेलू येथील बसस्थानकावर जलद बसेस जात नाही. यामुळे बायपास मार्गे थेट धावणाऱ्या बसेस व खासगी बस येथील यशवंत चौकात थांबतात. यामुळे प्रवाशांच्या गर्दीने हा चौक कायम फुलला असतो. या मार्गे धावणाऱ्या गाड्या चौकात उभ्या राहतात़ प्रवाशांची गरज लक्षात घेत येथे काही वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला. बससाठी प्रवाशांची वाढती संख्या पाहता सेलू येथील ग्रामस्थांनी या चौकात दोन प्रवासी निवाऱ्यांची मागणी केली होती. २००७-०८ मध्ये आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रवासी निवारे बांधण्यात आले़ या निवाऱ्यांचा उपयोग मात्र काही समाजकंटकांकडून वाईट कृत्याकरिता होत असल्याचे दिसते़या सर्व प्रकाराकडे संबंधित प्रशासन डोळेझाक करीत आहे. या प्रवासी निवाऱ्यासमोर वाहनधारक आपली वाहने उभी करून समोरच्या प्रवासाला जातात़ रात्रीच्या सुमारास येथे ओली पार्टी रंगत असल्याची माहिती आहे. प्रवासी निवाऱ्याच्या परिसरात दारूच्या शिश्या, पाणी पाऊच याचा खच आढळून येतो. यामुळे हा निवारा शौकिनांचे स्थान होत असल्याचे दिसते. या त्रासामुळे प्रवासी तेथे थांबून बसची प्रतीक्षा करीत नसल्याचेही दिसते़ आंबटशौकीनांकडून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ते भरउन्हात रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनाची प्रतीक्षा करताना दिसतात़ प्रवासी निवारा असताना तो प्रवाशांकरिता सोयीस्कर ठरत नसेल तर या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ राज्य परिवहन महामंडळ, बांधकाम विभाग व पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)
प्रवासी निवारे झाले समस्यांचे आगार
By admin | Updated: March 23, 2015 01:56 IST