वर्धा : जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ चितांजनक आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने, आरोग्य विभागाच्या वतीने केले जाणारे प्रयत्न अपूरे ठरत आहे. याकरिता डेंग्यूआजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांचा सहभाग मिळावा, जनजागृती व्हावी याकरिता वर्धा शहराच्या विविध भागात, विशेषत: रुग्णसंख्या जास्त असलेल्या झोपडपट्टी भागात आरोग्य विभाग वर्धा व वर्धा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पुलफैल सुदर्शन वॉर्डात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पावडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील बहुसंख्य खासगी डॉक्टर्स सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात डेंग्यू आजाराविषयक ध्वनी चित्रफित दाखवून करण्यात आली. डॉ. पावडे यांनी नागरिकांना डेंग्यू आजाराविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. डेंग्यू आजाराची लक्षणे, एकाएकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायु दुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालय किंवा जवळच्या दवाखान्यात जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा आजार एडिस इजिप्टी या डासांमुळे पसरतो, या डासांची पैदास घरगुती पाण्याचे साठे, कुलरची टाकी, निरुपयोगी साहित्य, टायर्स, नारळाच्या करवट्या, प्लास्टिकचे कप, फुटलेली भांडी इत्यादी मध्ये साचून असलेल्या पाण्यात होते. डासांची उत्पत्ती होऊ नये या करिता पाण्याची भांडी झाकून ठेवणे, आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी घासून स्वच्छ करावी, कुलर रिकामे करावे, निरुपयोगी साहित्य नष्ठ करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, डास चाऊ नये यासाठी, मच्छर दूर पळणारे क्रीम अगरबत्ती लावावी तसेच झोपताना मच्छरदानीचा उपयोग करावा, पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावे या सारख्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून काळजी घेतल्यास डेंग्यूला पूर्णपणे हद्दपार करणे सहज शक्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन डासअळ्या नष्ठ करण्यासाठी टेमीफॉस पाण्यात औषधी टाकण्यात आली. तसेच डासांची पैदास असलेली भांडी, हौद रिकामे करण्यात आले. तसेच डेंग्यू आजाराविषयक माहिती असलेली तसेच ती टाळण्यासाठीच्या उपाययोजना आणि त्यावरील उपाय याविषयक हस्तपत्रके वाटण्यात आली. या अभियानात डॉ. सचिन पावडे, डॉ. चंद्रकात जाधव, डॉ. नऊल घाटे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. सातपुते, डॉ. भगत, डॉ. अरविंद वंजारी, डॉ. सायरे, डॉ. मेशकर, डॉ. मेहरे, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी, समितीचे सर्व पदाधिकारी तसेच वर्धा डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शंतनू चव्हाण यांनी केले. अशाच प्रकारचे कार्यक्रम शहराच्या विविध भागात घेणार असल्याचेही वर्धा डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख डॉ. पावडे यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनाही डेंग्यू आजाराची भयावहता लक्षात घेत या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.(शहर प्रतिनिधी)
डेंग्यूविरोधात खासगी डॉक्टरांची मोहीम
By admin | Updated: November 10, 2014 22:48 IST