वर्धा : गृहरक्षक कायदा व सुव्यवस्था चोखपणे सांभाळत असून ते सामाजिक उपक्रमात अग्रक्रमावर आहे. गृहरक्षकांच्या उत्तम प्रतिमेमुळे अनेक तरुण या दलाकडे आकर्षित होत आहेत. या दलाला अधिक सक्षम बनविण्याकरिता आपण शासन स्तरावर प्रयत्न करू, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. गृहरक्ष दलाच्या ६८ व्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आ. डॉ. पंकज भोयर म्हणाले, आज नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन सक्षम असण्याची गरज आहे. पोलीस व गृहरक्षक दलाला मदत करणाऱ्या सुजान व प्रशिक्षित नागरिकांची नितांत गरज आहे. पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना व लोकोपयोगी उपक्रमांना संरक्षणाची उणिव भासते. प्रारंभी परिसर स्वच्छता मोहीम राबवून गृहरक्षकांनी वृक्षारोपन केले. प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यात आली. अतिथींनी गृहरक्षक दलाच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे निरीक्षण केले.होमगार्ड्सच्या ‘गार्ड आॅफ आॅनर’ पथकाचे संचालन कंपनी कंमाडर राम निवलकर यांच्या नेतृत्वात वरिष्ठ पलटन नायक हेमलता कांबळे, वरिष्ठ पलटन नायक बाबा तुरक पलटन नायक चंद्रकांत पिंजरकर, पलटन नायक गजानन ससाणे व पलटन नायक सय्यद यांनी आपल्या पथकाचे नेतृत्त्व केले.यावेळी मंचावर नाट्य दिग्दर्शक हरिष इथापे, स्कॉऊट्स आणि गाईड्सच्य राज्य सहाय्यक सचिव सारिका बांगडकर, अमरावतीचे जिल्हा समादेशक प्रा. आसोले, स्कॉऊटसचे राज्य मुख्यालय आयुक्त आर.आर. जयस्वाल, समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, उपअभियंता के.आर. बजाज व होमगार्ड्सचे जिल्हा समादेशक प्रा. मोहन गुजरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक भाषण जिल्हा समादेशक प्रा. मोहन गुजरकर यांनी करून गृहरक्षकांच्या प्रशंसनिय कार्याचा आढावा दिला व अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रशासन व लोक प्रतिनिधींच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक समादेशक चंद्रकांत हिवरे व केंद्र नायक रवींद्र चरडे तर आभार निदेशक दिपेश जवादे यांनी मानले. वार्षिक अहवाल निदेशक संतोष जयस्वाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी गृहरक्षकांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
गृहरक्षकदलाची प्रतिमा अनेकांना चालना देणारी
By admin | Updated: January 15, 2015 22:57 IST