समुद्रपूर : शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील कृषिपंप चोरींच्या घटनामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. या चोऱ्यांवर आळा बसविण्यात समुद्रपूर पोलिसांना यश आले असून चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. कृषिपंप चोरणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. नंदोरी शिवारामध्ये शेगाव (गो.) येथील शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या विहिरीवरील कृषिपंप चोरी गेल्याच्या अनेक तक्रारी समुद्रपूर पोलिसात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या शेतातील विहिरीवरून तीन एचपी, पाच एचपीच्या पाण्यातील मोटारपंप रात्रीच्या वेळेस बेपत्ता झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. चोऱ्यांच्या या सत्रामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात समुद्रपूरचे ठाणेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करीत शेगाव (गो.) येथील उमेश नामदेव उरकुडे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने केलेल्या चोरीची कबुली दिली. यात त्याला बुट्टीबोरी नजीकच्या सोनुर्ली येथील संदीप धनराज सोनडवले (२०) व ज्ञानेश्वर उर्फ नाना अशोक बडे (२६) हे दोघे सहकार्य करीत असल्याची कबुली दिली. यावरून या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून चार मोटारपंप जप्त करण्यात आले आहेत. अटकेत असलल्या चोरट्यांना न्यायालयात दाखल करून नऊ दिवसाची कोठडी देण्यात आली. या चोरट्यांकडून अनेक गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सदर कारवाई ठाणेदार अनिल जिट्टावार, पीएसआय उमेश हरणखेडे, बजरंग कुंवर, चांगदेव बुरंगे, रवी वानखेडे, सुरेश मडावी, प्रकाश मेंद यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
कृषिपंप चोरणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: November 3, 2014 23:30 IST