५१३ पैकी २८२ ग्रा.पं. चा स्पर्धेत सहभाग : निकष पूर्ण करणाऱ्या ग्रा.पं.चे केले गुणांकन प्रशांत हेलोंडे। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे जिल्हास्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. यात वर्धा जिल्ह्यात पिंपळगाव (वडाळा) ग्रामपंचायतीने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. पिंपळगावने सर्वाधिक ९३ गुण प्राप्त केले. द्वितीय पुरस्कार पिलापूर तर तृतीय पुरस्कार जामणी ग्रा.पं. ने पटकाविला आहे. जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त व्हावे, गावातील घाणीचे साम्राज्य दूर व्हावे, गाव निर्मल व्हावे याकरिता शासनाकडून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील ५१३ पैकी २८२ ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातील १९ गावे सर्वेक्षणात गुण तालिकेत बसली असून तीन गावांना प्रथम, द्वितीय तृतीय तर तीन गावांना विशेष पुरस्कार देण्यात आलेत. ग्रामस्वच्छतेचा प्रथम पुरस्कार आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (वडाळा) या गावाने पटकावला आहे. शौचालय व सांडपाणी व्यवस्थापनात या ग्रा.पं. ने गुण प्राप्त केलेत. १ मे ते ३० नोव्हेंबर दरम्यान या ग्रा.पं. द्वारे विविध उपक्रम राबविण्यात आलेत. या उपक्रमांमुळेही पिंपळगावला अतिरिक्त गुणांची कमाई करता आली आहे. परिणामी, ९३ गुण घेत या गावाला प्रथम पुरस्कार प्राप्त करता आला. द्वितीय पुरस्कार आष्टी तालुक्यातील पिलापूर ग्रा.पं. ने ९० गुण घेत पटकाविला. तृतीय पुरस्कार सेलू तालुक्यातील जामणी ग्रा.पं. ने ८६ गुण घेत प्राप्त केला. शिवाय ग्रामस्वच्छता अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात स्व. वसंतराव नाईक विशेष पुरस्कार सेलू तालुक्यातील आकोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर तर स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार देवळी तालुक्यातील पडेगाव ग्रा.पं. ला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे गावांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सहा गावांना १०.७५ लाखांचे पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कृत करण्यात येणार आहे. यातील प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, द्वितीय तीन लाख रुपये तर तृतीय दोन लाख रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय विशेष पुरस्कारांमध्ये तीन ग्रामपंचातींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पात्रतेसाठी हे होते निकष पुरस्कारास पात्र ठरण्यासाठी ग्रा.पं. ना काही निकष दिले होते. यात शौचालय व्यवस्थापन ४० गुण, सांडपाणी व्यवस्थापन १० गुण, घनकचरा व्यवस्थापन ५ गुण, पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन २० गुण, घर, गाव परिसर स्वच्छता ५ गुण, वैयक्तिक स्वच्छता ५, स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ५ गुण व लोहसहभाग, सामूहिक स्वयंपुढाकारातून उपक्रमावर १० गुण, असे १०० गुण होते.
ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात पिंपळगाव अव्वल
By admin | Updated: May 18, 2017 00:29 IST