आष्टी(शहीद) : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील तळेगाव (श्यामजीपंत) या बसस्थानकावर प्रवाशांचे खिसे कापून रोख व मूल्यवान वस्तू चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. पाकीटमारांच्या या टोळीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. कारवाई होत नसल्याने या भुरट्या चोरांचे चांगलेच फावते. या वाढत्या घटनांची दखल घेत पोलिसांनी कारवाई करित या चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे. बसस्थानकावर पैसे चोर व पॉकीटमार चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहे. या प्रकरणाची माहिती ठाणेदाराला देवूनही त्यांचे दुर्लक्ष होत आहे. नुकत्याच झालेल्या घटनेत याचा प्रत्यय आला. २ जुलै रोजी झलेल्या घटनेत पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणुन कार्यरत पी. एस. देशपांडे हे तळेगाव बसस्थानकावर आष्टी बसमधून उतरले. त्यांना नागपूरला जायचे होते. नागपूर बसमध्ये चढत असताना. एका २२ वर्षीय युवकाने त्यांचा पाठलाग केला. ही बाब देशपांडे यांच्या लक्षात आली. त्यांनीही सदर चोरट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले. बसमध्ये चढताच चोरट्याने त्यांचे पॉकीट मारले. लागलीच देशपांडे यांनी पाठलाग करून चोराला पकडले. त्याची कॉलर पकडून दोन कानशिलात लगावल्या व पॉकीट परत घेतले. याची माहिती तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश झामरे यांना दिली त्यांनी याकडे लक्ष दिले नाही, प्रकरणाची चौकशीही केली नाही. यासह सोयाबीनचे व्यापारी सईद खाँ समशेर खाँ यांनही असाच प्रत्यय आला. चोरांमुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेदारांनी मात्र अशी प्रकरणे घडतच असतात असे म्हणून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.(प्रतिनिधी)
तळेगाव बसस्थानकावर पाकीटमार सक्रिय
By admin | Updated: July 7, 2014 23:45 IST