खात्याखोरी परिसर : भिंतीची दुरुस्ती व खोलीकरण गरजेचेआकोली : वनविभागाच्या आकोली बिटामध्ये निर्मित पाझर तलावाची गत कित्येक वर्षांत देखभाल दुरूस्ती न केल्याने तलावात गाळ साचला आहे. एका बाजूने भिंतीला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावात पाणी संचय होत नाही. यामुळे गुरे, वन्यप्राणी, पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. खात्याखोरी परिसरातील जंगलात तीनही बाजूने टेकड्या असलेल्या ठिकाणी वनविभागाने पाझर तलावाची निर्मिती केली. त्याला आता कित्येक वर्षे लोटली. जंगलात चरायला येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील गुरांची तहान भागावी, जंगलातील वन्यप्राणी व पक्ष्यांची तृष्णा तृप्ती होऊन झिरपलेल्या पाण्यामुळे झाडे हिरविगार दिसावी, हा हेतू पूढे ठेवून पाझर तलाव बांधण्यात आला; पण गत कित्येक वर्षांपासून सदर तलावाकडे वन व कृषी विभागाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, तलावात मोठमोठी काटेरी झुडपे वाढली. गाळ साचला. यामुळे तलाव उथळ झाला. सदर तलावाच्या भिंतीच्या एका बाजूने अतिरिक्त पाणी वाहून जाण्याकरिता नाली काढण्यात आली होती; पण आता नालीचे रूपांतर नाल्यात झाले असून मोठे भगदाड पडले. पावसाचे पाणी तलावात साचण्याऐवजी वाहून जाते. तलावात साठा होत नाही. पूर्वी एप्रिल, मे च्या शेवटपर्यंत तलावाला पाणी राहत होते. यामुळे गुरांसह वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती होत होती; पण आता पावसाळा संपताच तलाव कोरडा होतो. यामुळे जंगली श्वापदांना शेत शिवारात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे; पण प्रशासनाला या पाझर तलावाचा विसर पडला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)दुरुस्ती केल्यास प्राप्त होईल गतवैभवसदर पाझर जंगलाच्या त्रिकोणात असून पावसाळ्यात येथील दृश्य मनमोहक असते. हिवाळ्यात परिसरातील दोन-तीन गावच्या गोधणाचा मुक्काम येथेच असतो. त्यामुळे आणखीच खुलून दिसतो. वनविभागाने पाझर तलावाची दुरुस्ती केल्यास परिसराला गतवैभव प्राप्त होऊ शकते; पण अद्याप कुणाचेही याकडे लक्ष नसल्याचेच दिसून येत आहे. पाझर तलाव गाळाने बुजल्याने आकोली बिटातील वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात शेत शिवारासह गावांकडे यावे लागते. यात शेतकरी व त्यांच्या गुरांना धोका होता. वन व कृषी विभागाने जलयुक्त शिवार अभियानात या तलावाचे खोलीकरण करीत पुनरूज्जीवन करणे गरजेचे आहे.
‘त्या’ पाझर तलावाला दुरुस्तीचे वेध
By admin | Updated: May 16, 2016 02:18 IST