बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : इंदिरा गांधी उड्डाणपूल दुरवस्थेत, अपघाताचा धोका वर्धा : शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली आहे; पण त्याच्या देखभाल, दुरूस्ती, डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच पाहावयास मिळत आहे. या पुलावरील रस्त्याची दुरूस्ती केली जाते; पण पदचारी मार्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचेच पाहावयास मिळते. परिणामी, पादचारी मार्ग धोक्याचा ठरू लागला आहे. या मार्गाला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून सिमेंटच्या पाट्याच बेपत्ता झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. वर्धा ते सेवाग्राम मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल गत काही दिवसांपासून दुरवस्थेत आहे. या पुलावर नागरिकांना पायी चालता यावे म्हणून पादचारी मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या या पादचारी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सिमेंटच्या पाट्यांचा आधार घेऊन सदर पादचारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे; पण यातील बहुतांश ठिकाणच्या पाट्याच बेपत्ता झाल्या आहेत. परिणामी, खड्ड्यांतून मार्ग काढताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी खड्डे तर कुठे सिमेंटच्या पाट्या व्यवस्थित असल्याचे दिसते. काही ठिकाणी सिमेंटच्या पाट्या तुटलेल्या अवस्थेत आढळून येतात. पायी चालत असताना या रस्त्यात पाय फसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय खाद्य निगमकडे उतरणाऱ्या पुलावरील पादचारी मार्गाची तर अत्यंत दुरवस्था झाली आहे. शिवाय रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. पादचारी मार्गावर खड्डे पडले असून नागरिकांना व्यवस्थित पायी चालता येत नसल्याने दुखापत होत असल्याचे सांगितले जाते. रस्त्यावरही खड्डे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पहाटे परिसरातील अनेक नागरिक पुलावर फेरफटका मारण्याकरिता जातात. काळोखात खड्डे दिसत नसल्याने त्यांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी) पहाटे व रात्री पायी चालणाऱ्यांना होते दुखापत शरीर स्वास्थ उत्तम राखण्यासाठी पायी चालणे हा सर्वोत्तम उपाय आहे. सध्याच्या जीवनशैलीत डॉक्टरांकडून जेवढे शक्य आहे, तेवढे पायी चालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बहुतांश नागरिक पहाटे आणि रात्री पायी चालून आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न करतात. शुद्ध हवेसाठी बरेच नागरिक उड्डाण पुलावरून पायी चालतात. यासाठी पुलावर पादचारी मार्गही आहे; पण या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने अनेकांना अपघातांनाच सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. पहाटे व रात्री काळोखामुळे कुठे खड्डा आहे, कुठे सिमेंटच्या पाट्या नाहीत, हे दृष्टीस पडत नाही. परिणामी, पाय खड्ड्यात फसून दुखापत ओढवून घ्यावी लागते. याबाबत अनेक नागरिकांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्यात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. या पादचारी मार्गाची दुरूस्ती करावी व रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी होत आहे.
पुलावरील पादचारी मार्ग धोक्याचा
By admin | Updated: February 16, 2017 01:24 IST