सतर्कतेसाठी गावात दवंडी घोराड : पंचायत समिती स्तरावरील योजनेचा लाभ मिळवून देतो, अशी बतावणी करीत तालुक्यातील दिंदोडा, हिवरा या भागात दोन युवक घरोघरी फिरत असून प्रत्येक लाभार्थ्यांकडून ५०० रुपयांची मागणी करीत असून त्यांना पंचायत समितीच्या योजनांचा लाभ देण्याची बतावणी करीत आहे. यात नागरिकांची फसवणूक होत असून यातून गावकऱ्यांनी याबाबत सतर्क राहावे, याकरिता गावात दवंडी देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याचा परवाना असलेली दुचाकी घेवून दिंदोडा व हिवरा परिसरात दोन युवक घरोघरी जावून शौचालय, ताडपत्री, टिनपत्रे, स्प्रे पंप, पाईप, स्प्रीकंलर आदी साहित्याचे वाटप सेलू पंचायत समिती अंतर्गत होत असल्याच्या भुलथापा ग्रामस्थांना देत आहे. यासाठी ५०० रुपयांचा भरणा आमच्याजवळ करावा, यातून आम्ही त्या योजनाचा लाभ घरपोच देवू असे सांगत गावात फिरत आहेत. हे युवक कोणतेही कागदपत्र घेत नसल्याने संशय बळावला व गावात या प्रकाराची चर्चा झाली. या सप्ताहात सातत्याने सुट्ट्या आल्या. या सुट्ट्यांच्या दिवसातच या युवकांनी ग्रामस्थांना घेरण्याचा प्रयत्न केला. सध्या या भागात या भुलथापांना कोणीही बळी पडले नसल्याचे बोलल्या जात आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता कुणीही अशा भुलथांपाना बळी पडू नका, असा सल्ला येथील लोकप्रतिनिधींनी दिला आहे. (वार्ताहर)
५०० रुपये द्या; पं.स.च्या योजनांचा लाभ घ्या
By admin | Updated: November 6, 2014 23:00 IST