जादा बसेसमुळे त्रास कमी : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ग्रामस्थ शहरातवर्धा : दिवाळी हा सर्वात मोठा सण असून प्रत्येक जण आपापल्या घरी जात तो साजरा करण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीही करीत असतात. सध्या बसेस आणि रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सणांच्या काळात अतिरिक्त बसेस सोडल्या जातात. यामुळे बसस्थानकावर विशेष गर्दी जाणवत नसली तरी जिल्ह्यातील अन्य बसस्थाकांवर प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा हे जिल्हास्थळ असल्याने ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक येथे खरेदीसाठी येतात. ग्रामीण भागातील नागरिकांना बसेस शिवाय पर्याय राहत नाही. यामुळे गावांतून येणारी प्रत्येक बस प्रवाशांनी गच्च असल्याचेच दिसून येत होते. दिवाळीनिमित्त प्रत्येक नागरिक काही ना काही प्रमाणात खरेदी करतात. घरांचे सुशोभिकरण, कपडे, पूजा साहित्य यासह अन्य वस्तूंची दिवाळीत खरेदी केली जाते. शहरांमध्ये जवळपास सर्वच साहित्य सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरांतून खरेदी करण्यावर भर देतात. वर्धा शहरातील बाजारपेठ मोठी असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी असते.गत काही दिवसांपासून शहरातील गर्दीमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक बस प्रवाशांनी भरलेली राहत असून बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी शहरातील बसस्थानकावर फेरफटका मारला असता प्रवाशांच्या गर्दीसह बसेसही मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. यावरून दिवाळी सणासाठी अधिक बसेस सोडण्यात आल्याचे दिसून येत होते. ग्रामीण भागातही बाजार गाड्या सोडल्या जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दिसून आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
प्रवाशांनी फुलतेय बसस्थानक
By admin | Updated: October 28, 2016 01:36 IST