हिंगणघाट : म. रा. तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाने पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात हिंगणघाट उपविभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी झाले आहे. हिंगणघाट तहसीलच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले आहे.तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध मागण्यांचा पाठ पुरावा सातत्याने शासनाकडे करण्यात आला, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप महासंघाचा आहे. तलाठी साजा व महसूल मंडळाची पुनर्रचना, कार्यालयीन भाडे, संगणीकरणातील ७/१२ व ई फेरफारच्या तांत्रिक विविध अडचणी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण, अवैध गौण खनीज वसुली कामातून तलाठयांची सुटका, तलाठी व मंडळ कार्यालयाची इमारत निर्मिती, द्विस्तरीय पद्धतीचा पदोन्नतीसाठी महसूल विभागात अवलंब, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवणे व अंशदान निवृत्ती वेतन या मागण्या रेटून धरल्या आहे. यासाठी ११ ते १६ एप्रिल पर्यंत काळ्या फिती लावून काम करण्यात आले. नंतर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन, जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. संगणीकृत डीएससी परत करण्यात आले असून २६ एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला म. रा. तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने पाठींबा दिला आहे. मागण्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या आहे, असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. आंदोलन माजी जिल्हा शाखा सचिव दिलीप कावळे, जिल्हा सचिव श्याम चंदनखेडे, उपविभागाचे अध्यक्ष संजय भोंग, सचिव विनोद खेकारे, सहसचिव प्रशांत भेंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाचे नवीन प्रशासकीय इमारती समोर सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
पटवाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: April 28, 2016 02:06 IST