अतिसार नियंत्रण पंधरवडा : नाटिका आणि प्रदर्शनाद्वारे ग्रामस्थांना मार्गदर्शनवर्धा : अतिसार नियंत्रण पंधरवड्यात आशा स्वयंसेविका घरोघरी जावून ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करणार आहे. ज्या घरी अशी बालके आढळतील तिथे ओआरएस पॉकिटे देऊन त्याचे द्रावण तयार करण्याची माहिती देणार आहे. ज्या घरी अतिसाराची बालके असतील तेथे ओ.आर.एस.चे द्रावण व झिंक गोळ्याची १४ दिवसांची मात्रा सुरू करणार आहे. हात धुुण्याचे महत्व, पोषण व स्तनपान याबाबत माहिती देतील. त्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी पालकांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तिरोडा येथील सरपंच सुनिता टिकले यांनी केले.अतिसार नियंत्रण पंधरवडा दिनांक १७ ते ८ आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार असून जिल्हास्तरीय पंधरवड्याचे उद्घाटन सांसद आदर्श ग्राम तरोडा येथे करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य देवराव पाटील, उत्तम चांभारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. डी. जी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सुनतकरी, खरांगणा (गोडे) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चामटकर उपस्थित होते.अतिसारामुळे शरीरातील पाण्याची व क्षारांची पातळी कमी होते. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. ओआरएसच्या द्रावणामुळे शरीरातील पाण्याची व क्षाराची पातळी भरून निघते. झिंकच्या गोळ्यांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवून भविष्यात अतिसार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे घरी येणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या माहितीचा व औषधाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.कार्यक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संदीप नखाते, साथरोग अधिकारी डॉ. विलास आकरे, जिल्हा माध्यम अधिकारी राहाटे, जिल्हा औषध निर्माण अधिकारी सोज्जवळ उघडे, आरोग्य सहाय्यक बाबाराव कनेर, डी.पी.एच. एन. कल्पना टोणे यांची प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरूवात संत केजाजी हायस्कूल तरोडा येथील विद्यार्थिनींनी समूहगीतांनी केली. आशा स्वयंसेविकांनी अतिसारावर नाटिका सादर केली. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हा हिवताप कार्यालय, वर्धा मार्फत कीटकजन्य आजारावर प्रदर्शनी लावण्यात आली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोनाली चामटकर यांनी केले. संचालन पिसे यांनी केले तर आभार जाधव यांनी माले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता देवडे, कोपुलवार, झाडे, पाटील, दीपा कांबळे, काळसर्पे, लोखंडे, बोटफुले, सुहास यांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)
मुलांच्या आरोग्यासाठी पालकांची सजगता गरजेची
By admin | Updated: July 30, 2015 01:55 IST