पावसासह शासकीय योजनांचाही शेतकऱ्यांना दगा : जाचक अटींमुळे कर्जवाटपाची गती ढिम्मच रुपेश खैरी। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज देण्याच्या सूचना केल्या. या सूचनांना बँकांनी नियमांची कैची लावून अग्रीम कर्जाकरिता गेलेल्या शेतकऱ्यांना परत पाठविले. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अग्रीम कर्जाची हमी शासन घेईल असे म्हटले, तरीही बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला. अग्रीम कर्जाच्या नावावर वर्धेत केवळ सहाच शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांना पावसासह शासनाच्या योजनाही दगा देणाऱ्याच ठरल्या. हवामान विभागाने यंदा उत्तम पाऊस असून तो वेळवेरच बरसणार असल्याचे भाकीत केले. यामुळे गत वर्षीचे नुकसान यंदा भरून काढण्याचा मानस बाळगत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली. मात्र नेहमीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यात मोठ्या दडीनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी केली; मात्र मारलेल्या दडीने काही भागात तिबार पेरणीच्या संकटाला समोरे जावे लागले. खरीपाच्या प्रारंभी शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता राज्यभर आंदोलन केले. याची दखल घेत शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र ती शेतकऱ्यांच्या तोट्याचीच असल्याचे दिसून आले आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास वेळ लागणार असल्याचे शासनाच्यवतीने शेतकऱ्यांना अग्रीम कर्ज देण्याचा निर्णय घेतला. मात्र बँकांकडून तसे कर्ज देण्यासंदर्भात आदेश दिले नसल्याचे शेतकऱ्यांना सांगत त्यांना आल्या पावली परत पाठविले जात आहे. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभच नसल्याचे दिसते. कर्जमाफीची रक्कम बँकेत आल्याशिवाय नवे कर्ज मिळणार नसल्याचे बँका बोलत आहे. यामुळे ही कर्जमाफीही शेतकऱ्यांना दगा देणारीच ठरली असल्याच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून मिळत आहे. शासनाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना शेतकऱ्यांना अग्रीम कर्ज वाटपाच्या सूचना दिल्या. असे असताना त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. आमच्याकडे शेतकरीच येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ देवळी येथील दोन बँकेतून केवळ सहा शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अग्रिम कर्ज देण्यात आले आहे. सर्वांना कर्ज देण्याच्या सूचना असताना झालेले कर्जवाटप विचार करायला लावणारे आहे. - ए.बी. कडू, जिल्हा उपनिबंधक, वर्धा पेरण्या अंतिम टप्प्यात; पावसामुळे पीक सध्या समाधानकारक गत दोन तीन दिवसापांसून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. जिल्ह्यात सरासरी पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून आले आहे. १० जुलै पर्यंत जिल्ह्यतील ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यात २ लाख २० हजार ८४६ हेक्टरवर कपाशी, ९६ हजार ६०१ हेक्टरवर सोयाबीन तर ५८ हजार ८८१ हेक्टरवर तुरीची पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र ४ लाख २५ हजार ६५३ हेक्टर असून यंदाच्या हंगामात ४ लाख १८ हजार ५०० पिकांची लागवड होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे. केवळ २०९ जणांनाच मिळाला पीक विम्याचा लाभ गत हंगामात पीक विम्याच्या नावावर केवळ २०९ शेतकऱ्यांना ९ लाख २६ हजार रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. वर्धेत कर्जदार आणि गैरअर्जदार अशा एकूण ९६ हजार १७९ शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता अदा केला. या हप्त्यापोटी १४ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आले. या पैकी ९११ शेतकऱ्यांनी त्यांना लाभ मिळावा याकरिता नुकसानीची तक्रार केली होती. यात एकूण ७०२ शेतकऱ्यांना मदत नाकारण्यात आली. नव्या पीक विम्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. यात आतापर्यंत कर्जदार गटातील १४ हजार १०७ शेतकऱ्यांनी नव्याने विमा उतरविल्याची माहिती आहे. या शेतकऱ्यांना कर्जाची उचल करतानाच पीक विम्याचा हप्ता कापण्यात आल्याची माहिती आहे.
केवळ सहाच शेतकऱ्यांना मिळाले अग्रीम कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:35 AM