सेलू, आर्वी तालुक्यात थरार : झोपेतच चालविले हत्यारसिंदी (रेल्वे) : अनैतिक संबंधांतून प्रियकराने आपल्या पे्रयसीच्या पतीची निर्घृण हत्या केली. अनैतिक संबंध आणि जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हत्या करण्यात आल्याचे समोर आले. ही घटना बुधवारी पहाटे २ ते २.३० वाजताच्या सुमारास येथे घडली. घटनेचे वृत्त पसरताच गावात खळबळ माजली. नरेश गोल्हर यांच्या शेतावर बाबाराव यादवराव परतेकी (३५) हा सालकरी म्हणून कार्यरत होता. त्याच्या पत्नीशी शरद रामचंद्र रहाटे (३८) याचे अनैतिक संबंध होते. हे प्रेमप्रकरण अनेक वर्षांपासून सुरू होते. दोन वर्षांपूर्वी परतेकी यांची पत्नी व शरद हे दोघे पळून गेले होते. यानंतर ती परत येऊन पुन्हा पतीसोबत राहू लागली; पण प्रेमसंबंध सुरूच होते. या प्रकरणावरून बाबाराव व आरोपी शरदचा वादही झाला होता. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठीच बुधवारी रात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास बाबाराव आणि त्यांची पत्नी झोपेत असताना शरदने शस्त्राने गळ्यावर वार करून बाबाराव परतेकी यांची निर्घृण हत्या केली.याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित आरोपीचा शोध घेतला. पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास हेलोडी परिसरातून शरद रहाटे याला अटक करण्यात आली. या प्रकरणी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वसंत मोहुर्ले घटनेचा पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)दगडाने ठेचून पत्नीचा खूनआर्वी : क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. शोभा वसंतराव कुरझडकर, असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, १५ वर्षांपूर्वी वसंत कुरझडकर याचा विवाह शोभा उदेभान कुंभेकार रा. सावंगी पोळ ता. आर्वी हिच्याशी झाला होता. पती-पत्नी रखवालीचे काम करीत होते. हे पती-पत्नी चार-पाच महिन्यांपूर्वी शरद निखार याच्या शेतात आले होते. घटनेच्या दिवशी वसंत रोहणा येथे बाजारासाठी गेला होता. परत येताना तो पत्नीच्या सावंगी पोळ या गावी गेला व तिला शेतात घेऊन आले. रात्री दोघांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने पती वसंताने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार शैलेश साळवी, उपनिरीक्षक अर्चना भूत यांनी घटनास्थळ गाठत आरोपी पतीला ताब्यात घेतले.(तालुका प्रतिनिधी)
अनैतिक संबंधांतून एकाची हत्या
By admin | Updated: May 19, 2016 01:41 IST