आर्वी : येथून खाद्यतेल घेवून कोल्हापूरला निघालेल्या टँकरमधील तेल चालकाने सोलापूर येथील बार्शी येथे विकल्याचे समोर आले आहे. चालक व टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आला असून या दिशेने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहेआर्वी-तळेगाव मार्गावरील मांडला येथील संतोष आॅईल फॅक्टरीचे साडेनऊ लाख रुपये किमतीचे १६५.६० क्विंटल खाद्यतेल घेवून अमरावती येथील ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम.एच ०४ डी.डी. ४६०३ क्रमांकाच्या टँकर कोल्हापूर येथे निघाला. हा टँकर कोल्हापूर येथील जैन कॉर्पोरेशन येथे पोहोचवायचा होता. आर्वीवरून निघालेला टँकर पाच दिवस उलटूनही खरेदीदारापर्यंत पोहचला नसल्याने आर्वीचे गिरधर अग्रवाल यांनी आर्वी ठाण्यात तक्रार नोंदविली. तपासात सदर टँकर बार्शी जि. सोलापूर येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला बेवारस अवस्थेत आढळून आला. यावर आर्वी पोलिसांनी बार्शी पोलिसांशी संपर्क साधत टँकरच्या चालकाला ताब्यात घेत आर्वीला आणले. यावेळी त्याने टँकरमधील तेल विकल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. यात चालकाच्या भावाचा समावेश असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. अशा घटनेत चोरीचा माल विकत घेणारी टोळी सक्रीय असल्याचा पोलिसांचा अंदाज असून तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
चालकानेच विकले टँकरमधील तेल
By admin | Updated: December 24, 2014 23:04 IST