वर्धा : नगर परिषद कार्यालयासमोरून पोस्ट आॅफिसकडे जात असलेल्या जेल रोड मार्गावर मध्यभागी अद्यापही रस्ता बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. नगर परिषदेसमोरून जात असलेल्या जेल रोडचे काही वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. पोस्ट आॅफिसपर्यंत हा रस्ता बांधण्यात आला असला तरी मध्यभागी १०० ते २०० मिटरचा पट्ट्यात मात्र रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता अद्यापही तसाच उखडलेला आहे. या मार्गावर गिट्टी उखडली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. बसस्थानकाकडून नागपूरकडे जात असलेल्या बसेस पोस्ट आॅफिसकडून वळत्या होऊन जेल रोडने नागपूरकडे जातात. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. असे असतानाही मध्यमागी उखडलेल्या रत्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. याचा वाहकचालकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गिट्टी परिसरात सर्वत्र पसरली असल्याने मोठा वाहनांच्या टायरने अनेकदा गोटे उडून ये-जा करणाऱ्यांना लागत असल्याच्या घटनाही अनेकदा घडत असतात. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, सामाजिक बांधकाम विभाग आणि न. प. मुख्याधिकारी आदींना देण्यात आल्या असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
न.प. मार्गावर अपघाताची शक्यता
By admin | Updated: February 2, 2015 23:11 IST