आर्वी : तालुक्यातील शिरपूर (बोके) येथील सरपंच रजनी संजय गोपाले यांच्यावर एका विशेष सभेत अविश्वास ठराव पारित करण्यात आला. यात तो आठ विरूद्ध शून्य मताने मंजूर करण्यात आला.तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यात सदस्य शेख हारून शेख सुभान, राजेंद्र बावने, शेख जरीफ शेख मन्नन, सुनिता नरेश भोंगाडे, अनिता थोटे, पुष्पा सोनोने, मिलिंद आवते, रजिनाबी जमील आदी सदस्यांची उपस्थिती होती. सभेच्या वेळी एकूण नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य उपस्थित होते. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १०५८ चे कलम ३५चे (३ अ) नुसार ग्रामपंचायत शिरपूर येथील सरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव पारित करण्यात आला. सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे, ग्रामसभा व मासिक सभेमध्ये घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे, मनमानी पद्धतीने कारभार चालविणे, ग्रामस्थांच्या कामात अडथळा आणणे, आवश्यक बाबींवर दुर्लक्ष करणे आदी कारणांचा सरपंचावर ठपका ठेण्यात आला. येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रर्वगासाठी राखीव आहे.(तालुका प्रतिनिधी)
शिरपूर (बोके) येथील सरपंचावर अविश्वास ठराव
By admin | Updated: May 13, 2015 01:53 IST