हिंगणघाट येथील घटना वर्धा : हिंगणघाट येथील रेल्वे स्थानकावरील शौचालयाजवळ एक पुल्लिंगी नवजात बालक बेवारस आढळून आले. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. बालकाला औषधोपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हिंगणघाट येथील रेल्वे कर्मचारी नारायण दत्त रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना फलाट क्रमांक २ वर असलेल्या शौचालयाजवळ एक नवजात बालक आढळून आले. त्याने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून सदर बालकाच्या माता-पित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रेल्वे स्थानकाच्या परिसरात कोणीच आढळून आले नाही. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांना आढळलेल्या या बालकाचे वय पाच दिवस असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर बालक पोलिसांनी औषधोपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून रेल्वे पोलिसांकडून त्याच्या पालकांचा शोध सुरू आहे. या बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याचे पालन पोषण करणे शक्य होत नसल्याने त्या बालकाला येथे सोडून त्याच्या आई वा वडिलांनी पळ काढला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिसचे सहायक पोलीस निरीक्षक नालट, शिपाई दायमा, अंकिता, राहूल यावले करीत आहेत.(प्रतिनिधी) अर्भक आढळल्याची दुसरी घटना गत काही दिवसांपूर्वी वर्धा रेल्वे पोलिसांना रेल्वे गाडीतील शौचालयात एक अर्भक आढळले होते. या प्रकरणाचा अद्याप कुठलाही सुगाव रेल्वे पोलिसांना लागला नाही. अशात पुन्हा आढळलेले हे अर्भक रेल्वे स्थानकावर असलेल्या पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न निर्माण करणारे आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रेल्वे स्थानकावरील शौचालयाजवळ आढळले नवजात अर्भक
By admin | Updated: October 7, 2015 00:40 IST