वायगाव (नि.) : गाव पातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करून गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदावर पुरूषाची मक्तेदारी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. महिलांना येथे संधी मिळत नाही. ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देवून महिलांची सरपंचपदी निवड केली जाते. त्याचप्रमाणे येथे आरक्षण देऊन महिलांकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जावी. याकरिता शासनाने नियमावली करून तशी तरतूद करण्याची मागणी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला राज या तत्वावर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान एका गावात तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपद महिलेकडे सोपविण्यात यावे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रारंभ १५ आॅगस्ट २००७ ला करण्यात आला. आगामी १५ आॅगस्ट रोजी या मोहिमेला सात वर्ष पूर्ण होणार आहे. या मोहिमेला गावोगावी उदंड प्रतिसाद मिळत आहे. यातून अनेक गावातील तंटे सोडविण्यात आले. मात्र यात महिलांचा सहभाग कमी असल्याचे दिसून येते. प्रत्येक क्षेत्रात आज महिला अग्रेसर आहे. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून स्वत:च्या कर्तृत्त्वावर महीलांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. याला ही समिती अपवाद ठरत आहे. शासनाने ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संधी दिली आहे. यामुळे महिला अध्यक्षपदाच्या निवडीकरीता तरतूदीची गरज आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एका गावात याचा समावेश केल्यास भविष्यात ही संख्या वाढू शकते. आज ग्रामीण राजकारणात सुद्धा महिलांच्या सक्रीय सहभाग आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, जि. प. सदस्य, प. सं. सदस्य तर गावपातळीवर सरपंच अशा विविध ठिकाणी महिला सक्रीय आहे. मात्र ग्रामसभेत महिलेची अध्यक्षपदी निवड का केली जात नाही, हा देखील प्रश्न आहे.याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गावपातळीवर ही योजना आणखी सकारात्मक कशी यशस्वी होईल याकरिता महिला अध्यक्षाचा विचार करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. मागील वर्षी अध्यक्षाची निवड करताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसणारा व्यक्ती निवडल्या जावा. त्याचप्रकारे तो स्वत: निर्व्यसनी असणारा असावा. वादापासून अलिप्त असणाऱ्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड केली जावी, अशी नियमावली काढण्यात आली. त्यानुसार गावागावात नियम लागु करण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव देखील आहे. त्यामुळे काही गावातील तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष हेच स्वत: अवैध धंद्याचे जनक आहे. असे असतानाही त्याची निवड केली जात आहे. ही बाब मोहिमेच्या उद्देशाला काळीमा फासणारी ठरत आहे. गावातील नवीन पिढीसमोर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाकडून वाद करणे, दारू पिणे हे प्रकार घडत असेल तर यातून काय संदेश जाईल. अवैध धंद्याला आळा घालण्यात यामुळे योजनेला किती यश मिळणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुलनेने महिलांमधे व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी आहे. यामुळे या समितीचे महत्त्वाचे पद महिलेकडे सोपविण्याची मागणी आहे.(वार्ताहर)
तंटामुक्त समितीला महिला अध्यक्षाची गरज
By admin | Updated: August 14, 2014 23:52 IST