पोलीस सुगाव्याच्या प्रतीक्षेत : शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष आर्वी: स्टेशन वॉर्ड परिसरातील हमालपुरा येथील सुरेश मोहोड यांचा अर्धवट जळालेला मृतदेह येथील शासकीय धान्य गोदामाच्या मागच्या बाजूस आढळून आला. घटनास्थळी कोणतेही पुरावे पोलिसांच्या हाती आले नसल्याने त्यांच्या तपासाची दिशा ठरली नाही. तपासाची दिशा ठरविण्याकरिता पोलिसांना सुगाव्याची प्रतीक्षा असल्याचे दिसते. यामुळे या हत्येचे गुढ अद्याप कायम आहे. शासकीय धान्य गोदामाच्या मागे आढळलेल्या या मृतदेहामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली होती. घटनास्थळी काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आल्याने येथे झटापट झाल्याचा अंदाच पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवाय मृतकाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जखमा असल्याचे पाहणीत समोर आले. मृतकाचा घटनेच्या दिवशी कुणाशी वाद झाला का, त्याच्या सोबत राहणारे त्याचे सहकारी कोण याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेनंतर मृतकाचे आर्वी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या घरी त्याची म्हातारी आई व मोठा भाऊ आहे. त्याच्या एका भावाचा पूर्वीच अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर यात आणखी काय नवी माहिती पोलिसांना मिळते यावर लक्ष आहे. ही हत्या शहरातील कुणाकडून करण्यात आली वा बाहेरच्या व्यक्तीचा यात समावेश आहे, याकडेही पोलिसांचे लक्ष आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मारेकरी कोण याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ हत्येचे गूढ अद्याप कायम
By admin | Updated: October 25, 2015 02:02 IST