जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बच्चू कडू यांच्या अटकेचा निषेधवर्धा : मंत्रालयात झालेल्या घटनेची सखोल चौकशी न करता आ. बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप करीत येथील प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी घटनेचा निषेध नोंदविणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. मंगळवारी आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयात काही कामावरून झालेल्या वादात एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यांनी केलेली मारहाण गरीब गरजवंतांच्या समस्या सोडविण्याकरिता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप करीत प्रहारने आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मुंडण करून घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)
प्रहारचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन
By admin | Updated: April 1, 2016 02:21 IST