आश्वासन ठरले फोल : लॅन्को व्यवस्थापनाचा प्रकारआकोली : लॅन्को कंपनीने प्रशिक्षित केलेल्या ८३ आयटीआय धारकांना कामावर घेण्याचे आश्वासन पाळले नाही. कामावर पूर्ववत घेण्याची मागणी करूनही आश्वासन न पाळल्यामुळे भूमिपूत्र संघर्ष समितीने धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू केले आहे. या मागण्या मान्य न केल्यास १९ नोव्हेंबरला काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. येथे ८३ आयटीआय धारकांना कंपनीमार्फत प्रशिक्षण दिले होते. सर्वांना सहा महिन्यात कामावर घेवू असे कंपनीने आश्वासन दिले होते. पण ते पाळण्यात आले नाही. त्यामुळे संघर्ष समितीने २ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले. यात १० तारखेपर्यंत चर्चा करण्याची मुदत दिली होती. पण लॅन्को व्यवस्थापनाने यात चालढकल करून चर्चेकरिता पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या युवकांवर बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. या धरणे आंदोलनात २५० नागरिक सहभागी आहे. लॅन्को कंपनी प्रशासनाने शिष्टमंडळाला चर्चेकरोता पाचारण केले होते. लॅन्कोच्यावतीने प्रोजेक्ट हेड अनिलकुमार, एचआर मॅनेजर रोनाल्डो, अनिल गायकवाड तर आंदोलनकर्त्यांच्यावतीने सुनील गफाट, गजानन कातरकर, शरद पहाडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार ८३ पैकी ४२ प्रशिक्षित युवकांना जानेवारीपर्यंत कामावर घेण्याचे लॅन्को प्रशासनाने मान्य केले. उर्वरित ४० प्रशिक्षित तरुणांना ६ महिन्यात कामावर घेण्याचे मान्य केले. पण कंपनीने ठेवलेला प्रस्ताव संघर्ष समितीने अमान्य करून सर्वच ८३ जणांना कामावर घेत असाल तर आंदोलान मागे घेवू असा निर्णय घेतला. १९ नोव्हेंबरला लॅन्कोचे काम बंद पाडण्याचा इशारा भूमिपूत्र संघर्ष समितीने निवेदनातून दिला आहे. आंदोलनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत पांडे व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. समस्येवर तोडगा काढण्याकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
८३ कामगारांना पूर्ववत करण्यासाठी आंदोलन
By admin | Updated: November 19, 2015 02:44 IST