वर्धा : शहरातील मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमधील अर्धेअधिक साहित्य दुकानांसमोर ठेवला जातो. हे साहित्य रस्त्यापर्यंत पसरले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.शहरात दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच दुकानांसमोर अनेक वस्तू ठेवल्या जातात. नागरिकांचीही दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडते. अशावेळी जागा कमी पडत असल्याने दुकानातील अनेक वस्तू दुकानाच्या बाहेर रस्त्यापर्यंत ठेवत आहेत. हा प्रकार शहरात सर्वत्र दिसून येतो. किराणा दुकानांमध्ये सिझन पाहून माल भरला जातो. शहरात ठोकमध्ये माल विकणारी काही ठराविक दुकाने आहेत. यात किरकोळ वस्तूही विकल्या जातात. त्यामुळे नागरिकांची अशा दुकानात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे दुकानात जागा व्हावी यासाठी दुकानातील अर्धेअधिक साहित्य दुकानाबाहेर ठेवल्या जात असल्याचे दिसत आहे. काही कपड्यांच्या दुकानातही हा प्रकार निदर्शनास येतो. यामुळे वहिवाटीस अडथळा येतो. शहरात सुसाट वेगाने दुचाकी दामटविणारे अनेक बाईकवेडे आहेत. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक रस्त्याच्या कडेला चालणे पसंत करतात. परंतु दुकानांतील साहित्यच रस्त्यापर्यंत प्जोचले असल्याने रस्त्याच्या कडेला कसे चालावे असा प्रश्न नागरिकांना पडतो. शहरात काहीच दिवसांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. पण शहरातील मुख्य मार्गावर अनेक व्यावसयिकांनी अतिक्रमण केले असतानाही ते न काढता इतर भागातील अतिक्रमण हटविले. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे. दुकानातील अर्धेअधिक साहित्य रस्त्यापर्यत ठेवत असलेल्या दुकानांवर कारवाईची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)
दुकानांमधील अर्धेअधिक साहित्य ठेवले जाते रस्त्यावर
By admin | Updated: February 18, 2015 02:00 IST