वर्धा : महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होत आहे. सत्ताबदल झाल्यास विकासाची चक्रे वेगाने फिरतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. प्रथमदर्शी, तसे चित्रही निर्माण झाले होते. अनेक योजनांच्या घोषणा झाल्या, काही थेट लाभाच्या योजनांचा नागरिकांना फायदाही होत आहे; पण प्रत्यक्ष विकास कामांची गती मात्र पाहिजे त्या वेगाने धावताना दिसत नाही. विकास कामे होतच नाहीत, अशातला भाग नाही; पण त्याचा वेग मंदावल्याचेच दिसते.वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी भाजपला अर्धा कौल दिला. एक खासदार आणि दोन आमदार भाजपाच्या पदरात टाकले तर दोन जागा काँगे्रसकडे राहिल्या. असे असले तरी भाजप सरकारने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वर्धा जिल्ह्याच्या अपेक्षांचे ओझे टाकले. त्यांनीही तो भार सहज पेलत विकास कामे हाती घेतली. वर्धा जिल्ह्याकरिता अनेक घोषणा करण्यात आल्या. यातील प्रत्येक काम प्रत्यक्षात साकार होताना दिसत नसले तरी अनेक कामांना सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनाची सोय, सौर ऊर्जेवरील कृषी पंप, विद्युत कृषी पंपांना निधी, बसस्थानकाचे नुतनीकरण, सेवाग्राम विकास आराखड्याला मूर्त रूप, कुटीर उद्योगांना चालना, शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण, रस्ते-पुलांची निर्मिती यासह अनेक घोषणा झाल्या. यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. सौर ऊर्जेवरील कृषी पंपांची योजनाही राबविली जात आहे; पण अन्य योजनांचा अद्याप हात घालण्यात आलेला नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामे हाती घेऊन निधीची मंजुरी दिली गेली; पण प्रत्यक्ष निधी प्राप्त न झाल्याने अनेक कामे रखडल्याचे अधिकारी सांगतात. सेवाग्राम विकास आराखड्याचे प्रारूप नव्याने तयार केले जात असल्याने मूर्त रूप प्राप्त होण्यास वेळच लागणार आहे. यासाठी निधी आरक्षित असला तरी प्रारूपच तयार नसल्याने सध्या केवळ बैठकाच होत असल्याचे दिसते. भाजप सत्तेत आल्यानंतर निवडणूक काळात दाखविलेली स्वप्ने पूर्ण करेल, अशी वातावरण निर्मिती झाली होती. त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे अनेक घोषणांवरून दिसते; पण प्रत्यक्ष कामांना हात घातला जात नसल्याने प्रश्नचिन्हच निर्माण होत असल्याचे दिसते. केवळ वर्धा जिल्ह्यापुरता विचार केला तरी शासनाची अनेक कामे व योजना प्रलंबितच असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यासाठी दोन आमदार व पालकमंत्री प्रयत्न करीत असले तरी घोषणांतील योजना प्रत्यक्ष साकार होण्याला महत्त्व आहे. या दृष्टीने शासनाकडून कोणती पावले उचलली जातात, हे येत्या काळात दिसेलच!(कार्यालय प्रतिनिधी)
घोषणा अधिक, तुलनेत कामांची गती संथ
By admin | Updated: October 31, 2015 03:04 IST