वर्धा : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास या विम्याचा सहजपणे लाभ घेता येते. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने बिगर विम्यानेच धावत आहे. सध्या रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू असतानाही याकडे डोळेझाक होत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक वाहने धावत आहेत. दरवर्षी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वाहन खरेदी केल्यानंतर वाहनचालकाने विमा काढावा, असा दंडक आहे. वाहनचालकांनी विमा काढला असेल तर अपघाताप्रसंगी संबंधित वाहन चालकाला नुकसान भरपाई मिळू शकते. मुख्य म्हणजे अशा अपघातांमध्ये कुटुंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यानंतर वाहन चालकाकडे विमा नसल्यास कुटुंबातील सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. वाहन चालकांकडे विमा नसल्यास वाहतूक पोलीस विभाग व आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते.वाहनचालकांमध्ये जागरूकता यावी, म्हणून शासनाकडून विविध शिबिरे राबवून मार्गदर्शन केले जाते. परंतु अजूनही जिल्ह्यातील लाखों वाहनचालक विमा काढण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बहुतेक वाहनचालक वाहनांची खरेदी करताना नियम असल्याने केवळ औपचारिकता म्हणून विमा काढतात. वाहन खरेदी करताना विमा काढल्यानंतर या विम्याची कालमर्यादा केवळ एकाच वर्षाची असते. त्यानंतर दुसऱ्या कोणत्याही खासगी कपंनीकडून विमा काढणे नियमानुसार आवश्यक आहे. परंतु एकदा वाहन खरेदी केल्यानंतर दुसऱ्यांदा विमा काढला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. वाहनाला अपघात झाल्यानंतर न्यायालयीन प्रकरणात विम्याची अत्यंत गरज भासते. त्यामुळे शासनाने विमा काढणे सक्तीचे केले आहे.(शहर प्रतिनिधी)
विमा नसलेली लाखो वाहने धावताहेत रस्त्यावर
By admin | Updated: January 20, 2015 22:40 IST