आर्वी : नागरिकांत उर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी प्रशिक्षणार्थींकरिता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन, द्वारा संचालित सामूहिक विकास योजना व विद्युत अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विस्तार केंद्र जळगाव येथे बुधवारी विद्युत बचत व उर्जा संवर्धन मार्गदर्शन शिबिर पार पडले. डॉ. ए.ए. गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाला शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. एम.एन. गावंडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेश खोलापूरे होते. योजनेचे समन्वयक प्रा. ए.बी. तट्टे, सल्लागार गजेंद्र कांबळे, विटणकर, ग्रामपंचायत सरपंच हरिदिनी पत्रे, सदस्य संगिता तायवाडे, किर्ती डफरे, प्रशांत वानखेडे, पंजाबराव पारिसे आदी मान्यवर उपस्थित होते. सामूहिक विकास योजना द्वारे विविध जनजागृतीपर व समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन कण्यात येते. त्याच अनुषंगाने विस्तार केंद्र जळगाव येथे बेसिक इलेक्ट्रीकल या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती गुल्हाने यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तट्टे यांनी केले. सामूहिक विकास योजनेच्या उद्देशाची त्यांनी माहिती दिली. प्रा. गावंडे यांनी विद्युत बचत व उर्जा संवर्धन यावर मार्गदर्शन केले. उर्जेचे स्त्रोत हे मर्यादीत आहे. त्यामुळे वीज वापर करतांनी काय काळजी घ्यावी, वीज बचतीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. प्रशांत वानखेडे यांनी रोजगार निर्मितीत सामूहिक विकास योजनेचे महत्त्व सांगितले. प्रा. खोलापूरे यांनी रोजगार व स्वयंरोजगार, उर्जा संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विशाल काळे यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, राहुल लाखे, अमित सुरंदसे, प्रवीण खेकाळे व ग्रामस्थांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
जळगाव येथे शिबिरातून विद्युत बचत व ऊर्जा संवर्धनाचा संदेश
By admin | Updated: February 12, 2016 03:12 IST