दुपारी उष्ण झळा : पारा घसरण्याची शक्यता कमीच वर्धा : उन्हाळ्याला जेमतेम प्रारंभ झाला आहे. उन्हाळ्याचा पहिला महिना म्हणून ओळख असलेला मार्च महिना संपत असतानाच शनिवारी पारा ४२ अंशावर पोहोचला. उन्हाळ्याच्या हिटचा महिना म्हणून ओळख असलेला एप्रिल आणि मे अद्याप बाकी आहे. या महिन्यात पारा नेमका कितीवर जाईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवसात पाऱ्यात सतत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गत चार दिवसात या पाऱ्याने ३४ अंशावरून थेट झेप घेत ४२ अंश गाठला. यामुळे येत्या दिवसात उन्ह आणखी भडकण्याची शक्यता आहे. या चढत्या पाऱ्यामुळे दिवसा रस्त्यावरील वर्दळ विरळ होत असल्याचे दिसून आले आहे. तर रस्त्यावर काही कामानिमित्त निघणारे उन्हापासून बचावाकरिता डोक्याला बांधूनच निघत असल्याचे रस्त्याने दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात वातावरणात कुठलाही बदल होण्याचे संकेत नसल्याने पाऱ्यातील असलेला चढ कायमच राहणार असल्याचे वर्धेच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. दर वर्षी प्रमाणे यंदाही वातावरणाच्या दबावाचा पट्टा तयार होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे; मात्र वास्तविकतेत तसा कुठलाही दबावाचा पट्टा तयार होणार असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत नसल्याचे वर्धेच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा पाऊस येईपर्यंत उन्हाचे चटके कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी) किमान तापमानात होणारी वाढ धोक्याची जिल्ह्यात कमाल तापमानाने भडका घेतल्याच्या नोंदी आहेत; मात्र या नोंदीसोबत प्रत्येक वर्षाला किमान तापमानही वाढत असल्याचे दिसून आले आहे. ही वाढत प्रत्येक वर्षाला वाढतच जात असल्याचे दिसून आले आहे. कमाल तापमान वाढल्यास दिवसभर उकाडा जाणवतो तर किमान तापमान कमी असल्यास रात्रीला थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो; मात्र जिल्ह्यात गत दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत आहे. शनिवारी जिल्ह्यात किमान तापमान २४.७ अंशावर नोंदविल्या गेले. तर ही नोंद गत तीन दिवसांपासून सतत आहे. कमाल आणि किमान तापमानात असलेले अंतर कमी होत असल्याने उन्हाचे चटके अधिक जाणवत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
मार्च अखेरीसच पारा @ ४२
By admin | Updated: March 26, 2017 00:58 IST