मातेचा आरोप : पतीसह इतरांवर मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी वर्धा : पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. शिवाय मारहाण केली. परिणामी, मेघा अमोल बावणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला पती व सासरची मंडळी जबाबदार आहे. यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोेंदवावा, अशी मागणी आई लता कवडू मोहाड रा. हिंगणघाटफैल पुलगाव यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. लता कवडू मोहाड यांची मोठी मुलगी मेघा हिचा विवाह २९ एप्रिल २०१३ रोजी अमोल विश्वेश्वर बावणे रा. समतानगर वर्धा याच्याशी पुलगाव येथे झाला. लग्नानंतर ती सासरी समतानगर येथे पती व सासूसह राहत होती. तिच्या दोन मावस सासू चंदा व मंदा या घराशेजारी राहतात. काही दिवस मेघाला व्यवस्थित वागविले. नंतर सासु कोणत्याही कारणावरून मानसिक त्रास देत होती. मावस सासू चंदा व मंदा या मेघाला काम सांगत होत्या. त्यांची कामे न केल्यास तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होत्या. अमोल याने तिला अनेकदा मारहाण केली. याबाबत वर्धा व पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. महिला तक्रार निवारण केंद्रातही तक्रारी केल्या. लग्न जुळविणाऱ्या मध्यस्थासह बैठका घेत समजविण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही. तिचा छळ सुरूच राहिला. अशातच सोमवारी दुपारी मेघाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा फोन आला. समतानगर येथील तिच्या घरी पोहोचल्यावर ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. मेघाने आत्महत्या केली असली तरी तिच्या मृत्यूला पती, सासू व दोन्ही मावस सासू जबाबदार आहेत. यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लता मोहाड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
सासरच्या छळामुळेच मेघाची आत्महत्या
By admin | Updated: August 12, 2016 01:40 IST