ती तक्रार खोटी असल्याचा आरोप : सेवाग्राम रुग्णालयातील प्रकारवर्धा : सेवाग्राम रुग्णालयातील एका विद्यार्थिनीने एक विद्यार्थी व दोन विद्यार्थिनींच्या विरोधात सेवाग्राम पोलिसात केलेली विनयभंगाची तक्रार खोटी आहे. ती परत घ्यावी. तसेच त्या विद्यार्थिनीने आपल्यामित्राकरवी धमक्या दिल्या, याची तक्रार आधीच व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र व्यवस्थापनाने कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप करीत सेवाग्राम रुग्णालयातील वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी निदेर्शने केली. परिणामी दिवसभर येथील बाह्यरुग्णसेवा प्रभावित झाली. केवळ इमरजन्सी रुग्णांवर उपचार करण्यात आले. सदर आंदोलनानंतर सेवाग्राम रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सुरुवातीला प्राप्त झालेली तक्रार अखेर सेवाग्राम पोलिसांकडे वळती केली. तसेच तिघांविरुद्ध तक्रार करणाऱ्या त्या विद्यार्थीनीला दुसऱ्या विभागात हलविल्याची माहिती येथील वैद्यकीय सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम रुग्णालयातील चयन सरकारसह अॅनी व खूशबू यांच्याविरुद्ध एका मुलीने सेवाग्राम पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली. यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वास्तविक, सदर तक्रारकर्त्या मुलीविरोधात अॅनीने आधीच म्हणजे गुन्हा दाखल व्हायच्या दोन दिवसांपूवी व्यवस्थापनाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र व्यवस्थापनाने त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर तक्रारीची व्यवस्थापनाने दखल घेतली असती तर त्या तिघांविरोधात गुन्हे दाखल झाले नसते. ही बाब पुढे करुन आज येथील विद्यार्थ्यांनी निदर्शने करीत ती खोटी तक्रार परत घ्यावी. तसेच व्यवस्थापनाकडे दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.(जिल्हा प्रतिनिधी)
वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांची निदर्शने
By admin | Updated: August 25, 2016 00:41 IST