वर्धा पोलिसांची कारवाई : कंपनीच्या व्यवहारात ३४ लाखांची अफरातफर वर्धा : नजीकच्या नालवाडी भागातील उन्नती मोटर्समध्ये विक्री अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विजय बबन लोकरे (४०) याने अकरा ग्राहकांना गंडा घातला. यात ३४ लाख ४९ हजार रुपयांची अफरातफर केली. याची शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. यानंतर शोध मोहीम राबवून अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. विक्री अधिकारी म्हणून कार्यरत असताना विजय लोकरे याने ग्राहकांकडून वाहन खरेदीसाठी देण्यात आलेले पैसे वेळोवेळी स्वत:साठी खर्च केले. पहिल्या ग्राहकाचे खर्च केलेले पैसे कंपनीत भरताणा दुसऱ्या ग्राहकाकडून आलेल्या रोकडीचा बनावट दस्तऐवज बनवून भरणा केला. या पद्धतीने लोकरे याने जवळपास ११ ग्राहकांना गंडा घालत कंपनीची चक्क ३४ लाख ४९ हजार रुपयाने फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच नागपूर येथील उन्नती मोटर्सचे व्यवस्थापक विष्णू अग्रवाल यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विजय लोकरे विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.(शहर प्रतिनिधी)
अकरा ग्राहकांना गंडा घालणारा जेरबंद
By admin | Updated: April 1, 2017 01:23 IST