वर्धा : महिला व तरुणींना आपले दैनंदिन जीवन निर्भीडपणे जगता यावे, त्यांना तातडीने पोलिसांची मदत मिळावी तसेच सर्व सामान्य नागरिकांना तातडीने सेवा मिळावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन पथके निर्माण केली आहेत. यात एक पथक महिलांना विशेष सुविधा देणार आहे तर मार्शल कमांडो पेट्रोलिंंग नामक पथक नागरिकांना पोलीस सेवा देण्याकरिता शहरात राहणार आहे. महिलांच्या गर्दीची ठिकाणे, शाळा-कॉलेज परिसर, शिकवणी वर्ग, कॉम्प्यूटर क्लासेस, निर्जन स्थळे इत्यादी ठिकाणी पेट्रालिंग करून महिला मुलींची छेड करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करणार आहे. महिलांनी पोलीस हेल्पालाईन क्रमांक १०० (टोल फ्री) महिला हेल्पलाईन क्रमांक १०९१ किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून माहिती दिल्यास तातडीने आपल्यापर्यंत पोहचून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. पथकातील पोलीस उपनिरीक्षक ममता अफूणे या महिला व तरुणीसोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेणार आहेत.शहराची सहा विभागात विभागणी करून सहा मोटार सायकलद्वारे २४ मार्शन कमांडो दोन पाळीत सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत शहरात सतत पेट्रोलिंग करणार आहे. शहरातील कोणत्याही भागात शांतता व सुव्यवस्थेला तडा देणारी कोणतीही अप्रीय घटना घडल्यास त्याबाबत जनतेने पोलीस हेल्पलाईन क्रमांक १०० (टोल फ्री) किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे पोलीस विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. महिला संबंधी गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांसंबंधी गुन्हे चैन स्रॅचिंग, मारामारी, भरधाव वेगाने चालणारी वाहने इत्यादी प्रकारांवर प्रतिबंध ठेवण्याकरिता मार्शल कमांडो पथक काम करणार असल्याचेही पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
महिला विशेष पथकासह शहरात मार्शल कमांडो पेट्रोलिंग
By admin | Updated: September 1, 2014 00:07 IST