अन्नधान्याचे नुकसान : शेतातील झाडे तोडण्याची वेळ सेवाग्राम : माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे. माकडांमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात. काही वर्षांत माकडांनी शेताकडे व आसपासच्या गावांकडे धाव घेतली आहे. प्यायला पाणी, खायला अन्न आणि फळझाडे असतील अश्या ठिकाणी माकडे धुडगूस घालत आहेत. घरच्या अंगणात, गच्चावर तसेच परसबागेत अन्नधान्य वाळत घातले असल्यास विचारायलाच नको अशी परिस्थिती होऊन जाते. गावाकडेच नाही तर शेतातही माकडांची उच्छाद मांदला आहे. यात पिकांचे बरच नुकसान होत असते. शेतकरी सातत्याने माकडांना हुसकावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तराही माकडे जुमानताना दिसत नाही. त्यांनाही माणसांचे हाकलणे नित्याचे झाले असल्याने त्यांचा मुजोरपणा वाढला. आहे. महिलांवर तर अनेकदा ही माकडे हल्ला करीत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. यात लहान मुलांनाही धोका असतो. पूर्वी शेताच्या धुऱ्यावर शेतकरी अनेक प्रकारची झाडे लावत असे. यात आंबा, पेरू, जांभूळ आदी झाडांचा समावेश असायचा. परंतु याच झाडांवर माकडे उच्छाद मांडत असल्याने कंटाळून शेतकरी आता धुऱ्यावरील झाडे तोडत आहेत. यामुळे इंधनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न पडला आहे.(वार्ताहर) अनेकदा शेतकरी व महिलांवर हल्ले माकडांचा मोठा कळपच गावात किंवा शेतात शिरत असतो. संख्येने जास्त असलेली माकडे कुणालाही जुमानत नाही. त्यामुळे तसेच हाकलण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकरी व महिलांवर माकडांनी हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांना माकडांच्या मर्कटलीला पाहून आनंद होत असला तरी ही माकडे केव्हा हल्ला करतील याचा नेम नसतो.
मर्कटलीलांनी शेतकरी त्रस्त
By admin | Updated: October 19, 2015 02:20 IST