वर्धा : बारुदचा गोळा फुटल्याने एक मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना तळेगाव श्या.पंत येथील कब्रस्तान परिसरात १३ रोजी दुपारच्या सुमारास घडली. घटना उजेडात येताच पोलिस निरीक्षक आशिष गझबिये यांनी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. रवी निकम रा. तळेगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंस्त्र प्राण्यांपासून पिकांचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधावर कणकीचा गोळा करुन त्यात बारुद भरुन ठेवले जातात. याचा उपयोग रानडुक्करांपासून पिकांचे संरक्षण व्हावे हा देखील या मागील उद्देश असतो. शहरातील कब्रस्तान परिसरात बारुदीचे काही गोळे पडलेले दिसून आले. जखमी रवी याला हे गोळे दिसताच त्याने हे नेमके कशाचे गोळे हे तपासण्यासाठी एक गोळा जमिनीवर जोराने आपटला. दरम्यान त्या गोळ्याचा स्फोट झाला या स्फोटात रवीच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ मार लागल्याने त्याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.