मागणी : हिंगणघाट ते वर्धा रस्त्याची दुरवस्था कायमचवर्धा : गत काही वर्षांपासून हिंगणघाट ते वर्धा या ४५ किमी अंतर असलेल्या वर्दळीच्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता राज्य शासनाने या मार्गाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित नव्याने रूंदीकरणासह संपूर्ण ४५ किमी हिंगणघाट ते वर्धा राज्यमार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी अ.भा. किसान क्रांतीचे विदर्भ अध्यक्ष संतोष तिमांडे यांनी केली. याबाबत निवेदनही सादर करण्यात आले आहे.हिंगणघाट ते वर्धा या राज्यमार्गाची केवळ डागडुजी करण्यात येते. यात शासनाचे आजपर्यंत लाखो रुपये खर्च झाले; पण रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. या मार्गावर प्रवास करताना प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांच्या मधोमध खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. वर्धा ते हिंगणघाट प्रवासही तब्बल दीड तासांचा झाल्याचे दिसून येते. हिंगणघाट ते वर्धा हा महत्त्वाचा मार्ग असून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. वाहनांच्या संख्येत भरमसाढ वाढ झाली असून जिल्ह्यातून महत्त्वाच्या शहरांकडे जाणारा तसेच कारखाने व उद्योगांमुळे जड वाहनांचे आवागमनही वाढले आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे नागरिकांना शासकीय कामांकरिता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी येथे यावे लागते. शिवाय सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालयात जाणाऱ्या आजारी रुग्णांनाही या दयनीय असलेल्या खड्ड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. हिंगणघाट ते वर्धा या रस्त्यावर खोल खड्डे असल्याने वाहनांमध्ये बिघाड होणे नित्याचेच झाले आहे. प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या भंगार बसेस तर रस्त्यांवरील खड्ड््यांमुळे प्रवाश्यांना डोकेदुखीच ठरत आहेत. या राज्यमार्गाने दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे; पण ते कुठपर्यंत होणार, याबाबत साशंकताच आहे. वर्धा ते हिंगणघाट या संपूर्ण रस्त्याचे काम करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
राज्यमार्गाचे डांबरीकरण करा
By admin | Updated: January 10, 2016 02:42 IST