वर्धा : येथील आर्वी नाका परिसरात सोमवारी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दुचाकीने जात असलेल्या दोघांजवळून साडेतीन लाख रुपये पळविल्याची घटना घडली होती. या घटनेचा छडा लावण्यात वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून त्यांनी याप्रकरणी तक्रारकर्त्यासह तिघांना अटक केली आहे. या तिघांनी मित्रावर वाढत असलेले कर्जाचे ओझे कमी करण्याकरिता हे लुटमार नाट्य रचल्याचे बुधवारी कबूल केले आहे.लुटमारीत पळविलेली रक्कम अद्याप पोलिसांच्या हाती आली नाही. शिवाय लुटमारीत वापरलेली दुचाकीही जप्त करणे बाकी आहे. अटकेत असल्यांची नावे पंकज टेंभेकर, अतुल नेवारे व भूषण आखरे रा. गोराळा असे असून यातील नेवारे हा सीआरपीफ मध्ये कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्यांनी पळविलेली रक्कम लवकरच जप्त करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी सांगितले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उत्कर्ष मायक्रो फायनान्स मध्ये कार्यरत असलेला पंकज टेंभेकर व त्याचा सहकारी कर्मचारी विजय गजभिये हे दोघे आर्वी नाक्यावरील बँकेत पैसे आणण्याकरिता गेले होते. रक्कम घेवून परत येत असताना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपावडर टाकून त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपये लंपास केले होते. या प्रकरणी शहर ठाण्यात पंकज टेंभेकर याच्या तक्रारीवरून लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास सुरू असताना पंकज टेंभेकर व त्याच्या सोबत असलेला विजय गजभिये या दोघांच्या बयानात तफावत दिसत असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी त्यांचा तपास केला असता पंकजच यातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले. त्याच्यावर मानसिक दडपण आणून अधिक विचारणा केली असता त्याने त्याला मदत केलेल्या दोन साथीदाराची माहिती दिली. त्या दोघांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, सयहायक उपनिरीक्षक उदयसिंह बारवाल, जमादार अशोक वाठ, मनोज नांदूरकर, किशोर आप्तूरकर, समीर कडवे, आनंद भस्मे, अमर लाखे व विलास लोहकरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)लुटमारीच्या रकमेतून करणार होते कर्जाची परतफेडअटकेत असलेल्या भूषण आखरे याने गत वर्षी कृषी केंद्र सुरू केले होते. यात त्याने उधारीवर जवळपास आठ लाख रुपयांचे साहित्य भरले. शिवाय ते शेतकऱ्यांना उधारीत विकले. यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला होता. तसेच पंकज टेभेंकर याचाही त्याच्या पत्नीसोबत वाद होता. तिला घटस्फोट हवा होता. याकरिता त्याला पैशाची गरज होती. तिसरा अतुल नेवारे हा नोकरीवर असून त्याला पैशाची गरज नव्हती. केवळ मित्राची मदत करण्याकरिता तो सहभागी झाला. या लुटमारीत ते यशस्वी झाले असते तर पंकज व भूषण ही रक्कम आपसात वाटून घेणार होते, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली. अतुल व पंकजने रचला कटदोघेही मित्र आर्थिक विवंचनेत असल्याचे पाहून अतूल याने लुटमार करण्याची कल्पना दिली. यावरून पंकज याने कट रचला. योजनेला मूर्तरूप देण्यापूवी हे तिघे आर्वी नाक्यावर भेटले. याच वेळी येथील एका दुकानातून मिरची पावडर खरेदी केले. गतीरोधकावर वाहन हळू होताच वाहन चालविणाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्याचे ठरले. योजनेनुसार काम झाले. लुटमार झाली, रक्कम पळविली. रक्कम पळवून सीआरपीएफ मध्ये असलेला अतूल त्याच्या नोकरीवर रुजू होणार होता. मात्र तो पोलिसांच्या हाती आला.
मित्राकरिता रचले लुटमार नाट्य
By admin | Updated: March 19, 2015 01:45 IST