आरोग्य सेवेचे तीनतेरा: कर्मचारी असतात अनुपस्थितीतसमुद्रपूर : नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याकरिता असलेल्या पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात असलेल्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी केंद्राला कुलूप ठोकले. या संदर्भात गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेला माहिती दिली होती. त्यांच्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत कार्यालयाला कुलूप लावले. गावात तापाची साथ सुरू आहे. असे असताना नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता असलेले हे आरोग्य केंद्र कधी उघडते तर कधी बंदच राहते. येथील वैद्यकीय अधिकारी गावात न राहता तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. यामुळे येथील नागरिकांना या आरोग्य केंद्राचा कुठलाही उपयोग नाही. तसा ठरावही ग्रामपंचायतीच्या सभेत घेण्यात आला. हा ठराव गावकऱ्यांनी जि.प. आरोग्य विभागाला दिली होती. यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष झाले. अखेर या केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता. याची कल्पनाही गावकऱ्यांनी वरिष्ठांना दिली. यावरही काहीच कारवाई झाली नाही. अखेर आज सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. यावेळी सरपंच सुजाता भगत, उपसरपंच यादव राऊत, सदस्य प्रकाश गेडाम व मनोहर गेडाम, तंटामुक्ती अध्यक्ष भारत चाफले व शंभर गावकरी उपस्थित होते. सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने येथे भेट दिली नव्हती. (तालुका प्रतिनिधी)
गावकऱ्यांनी ठोकले पिंपळगाव आरोग्य उपकेंद्राला कुलूप
By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST