शेळगी गॅस स्फोट: ‘कुछ बी बचा नही, जिंदगी की कमाई घंटेमें गयी’ बाधितांची करुण व्यथा
विलास जळकोटकर : सोलापूर -
शेळगी परिसर... बहुतांश गोरगरीब, हातावरचं पोटं असणा-या कष्टकरी वर्गाची वसाहत... दररोज रक्ताचा घाम करुन आपल्या संसाराचा गाडा चालविणा-या कष्टक-यांवर मंगळवारची सायंकाळ काळरात्र ठरली. शॉर्टसर्किट निमित्त ठरलं अन् भलामोठा स्फोट होऊन, करुन खाणारी पोटं उघड्यावर पडली अन् रात्री सारं उजाड झालं. मित्रनगर या विस्तारित भागातील बसवेश्वरनगरात ही दुर्घटना घडली. घटनेच्या दुस-या दिवशी सारा उघड्यावर पडलेला, भस्मसात झालेला संसार हताशपणे पाहणारे बाधित त्यातूनही काही मिळतेय का? हे शोधत होते. ‘साब कुछ बी बचा नही, जिंदगी की कमाई घंटेमें गयी’ अशा शब्दात आपल्या करुण व्यथा मांडताना सभोवतालच्या लोकांचेही काळीज चिरत गेले.
हद्दवाढ भागात मोडणारा शेळगी परिसर मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. याच भागातील मित्रनगरात एका टोकाला बसवेश्वरनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी काळ धावून आला आणि युसूफ बागवान यांच्या घरात सिलेंडर गॅसचा स्फोट झाला. वा-याच्या वेगाने एकेक करीत २४ कुटुंबांच्या पत्र्यांची घरे पेटून तब्बल पाऊण कोटीच्या घरात मोठ्ठं नुकसान झालं. नशीब बलवत्तर यात कोणीही दगावला नाही. आज (बुधवारी) दुस-या दिवशी अख्ख्या बसवेश्वरनगरवर या दुर्घटनेची दाट छाया पसरलेली दिसली. एकास एक चिकटून असलेली पत्र्यांची घरे जमीनदोस्त झाली होती. पत्रे तुडवत एकेका घराची पाहणी करताना सारा कोळसा झाल्याचं विदिर्ण चित्र पाहून येणाºया-जाणाºया प्रत्येकाचे डोळे पाणावत होते.
जे-ते बाधित कुटुंब उरलं सुरलं काही राहिलंय काय, याचा शोध घेताना इथे मार्केट यार्डात भाजीपाला व्यवसाय करणा-या राबिया युसूफ बागवान भेटल्या. डोळ्यात पाणी आणत त्यांनी आपली करुण व्यथा मांडली. साब कुछ बी बचा नहीं, घंटेमें जिंदगी की कमाई जल गयी. आता जगायचं कसं म्हणत धाय मोकळून रडू लागल्या. मंगळवारच्या दिवशी राबिया उस्मानाबादला माहेरी गेल्या होत्या. पती युसूफ कामाला गेलेले आणि घरात ही दुर्घटना घडली. आगीच्या भक्ष्यस्थानी सोने-चांदीचे दागिने घट्ट झालेले दिसले. कपाटातील पन्नास रुपयांच्या नोटांच्या गठ्ठ्याची जळालेली थप्पी दाखवताना त्यांना अश्रू आवरता आले नाही.
पुढे गजाला बागवान भेटल्या. त्यांचीही हीच अवस्था. सर्वांच्या डोळ्यांत तीव्र निराशेच्या छटा... आता पुढं काय ? कसं होणार ? हा यक्षप्रश्न प्रत्येकाला सतावत होता. दहा जणांच्या कुटुंबाचा गाडा चालवणा-या शुकूर सय्यद यांना बोलावेनासे झाले. त्यांच्या पत्नी कुलसुंबी ‘अब हम क्या करे, सब बेसहारा हुए’ म्हणत सरकारकडे मदतीची याचना केली. भाजीपाल्याचा व्यवसाय करणा-या पुतळाबाई सिद्धप्पा व्हनमोरे या कुटुंबाचीही हीच स्थिती. दोन मुली, एक मुलगा एक कुटुंब आणि दुसºया मुलाचं कुटुंब या सा-यांनी पै पै जमवलेला संसार होत्याचा नव्हता झाला. पाच तोळे सोने, व्यवसायासाठी ठेवलेली रोख रक्कम जळून गेल्याने आता आमच्यापुढे अंधार असल्याची व्यथा त्यांनी मांडली. या स्फोटानं उजाड झालेल्या शहनाज रफिक मिरदे, अल्लाउद्दीन अब्बास सय्यद अशा प्रत्येक कुटुंबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
झाल्या घटनेच्या प्रकाराने सारेच हतबल झाले आहेत. आजूबाजूच्या सर्वांनीच एकदिलाने प्रत्येकाला दिलासा देण्याचे काम केले आहे. आता गरज आहे यांचा मोडलेला संसार पुन्हा सावरण्यासाठी मदतीची. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून यंत्रणा कामास लावली आहे.
फाटक्या संसाराला ठिगळ लावा !
क्षणात झालेल्या या स्फोटानं प्रत्येकापुढे अंधार पसरला आहे. आता प्रशासनानं आम्हाला आधार द्यावा. सकाळी कलेक्टर कचेरीकडची तलाठी, सर्कल येऊन पंचनामा करुन गेले. आता मायबाप सरकारनं लक्ष देऊन फाटक्या संसाराला ठिगळ लावण्याचं काम करावं. देव करो अशी वेळ कुणावरही येऊ नये अशा आशयाच्या भावना या मंडळींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.
ना धर्म ना पंत सारे मदतीला धावले
या दुर्घटनेने पुन्हा एकदा माणुसकीचा झरा अद्याप आटलेला नाही याची प्रचिती दिसून आली. उघड्यावर पडलेल्या या कुटुंबांना हिंदू-मुस्लीम सर्व बांधवांनी आपापल्या घरातील यथाशक्ती मदत करुन त्यांच्या जेवणाची मदत केली. जमियते उल्माहिंद या संघटनेने मंगळवारच्या रात्री, आज दिवसभरात जेवणाची सोय केली होती. सारेच उघड्यावर पडल्यामुळे महिलावर्गाची जवळच असलेल्या शाळेत राहण्याची सोय करण्यात आली. ज्यांचे नातलग आहेत त्यांनीही निरपेक्ष भावनेने सहारा दिला. पुरुष मंडळी मात्र आगीत भस्मसात उष्ण राखेच्या साक्षीनं रस्त्यावरच रात्र घालवली. दुपारी रस्त्यावर मांडव घालून विसाव्याची सोय करण्यात आली.
दुस-या दिवशी पुन्हा आग
मंगळवारी रात्री झालेल्या स्फोटामुळे बेचिराख झालेल्या बसवेश्वरनगरमध्ये आज सकाळी पुन्हा आग लागल्याच्या वार्तेमुळे एकच गोंधळ उडाला. रात्री अग्निशामक बंबाद्वारे फवारणी करुन आग आटोक्यात आणली होती. सकाळी याच ठिकाणी पत्र्याच्या खाली विस्तव धुमसत असल्याचे लक्षात आल्याने तातडीने सर्वांनी धावाधाव करुन ड्रमने पाणी ओतून धुमसणारी आग विझवली.
एवढं म्हणणं लक्षात घ्या !
बसवेश्वरनगरमधील या दुर्घटनेत एकाच घरामध्ये काही ठिकाणी दोन, तीन कुटुंबे वास्तव्याला आहेत. प्रशासनाकडून नुकसानभरपाई, मदत देताना ती सर्वांना मिळेल याची कार्यवाही व्हावी. दुर्दैवाने आमच्यावर संकट ओढावले आहे. यातूनही आम्ही नक्कीच बाहेर पडू, पण सरकारकडून जी काही मदत मिळणार आहे ती व्यवस्थित मिळावी, अशी मागणी बाधितांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
वितळलेले दागिने शोधण्यासाठी धडपड
दुर्घटनेत पै पै जमवून केलेल्या दागिने राखेतून कुठे सापडतात का यासाठी प्रत्येक कुटूंबीयांची केविलवाणी धडपड सुरु होती. काहींना वितळून घट्ट झालले दागिने मिळाले. दुख:तही त्यांच्या चेहºयावरचे हास्य पाहून अनेकजण सद्गदीत झाले.