झडशी : शासनामार्फत लाखो रूपये खर्चून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलिताची सोय व्हावी आणि उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर पंचधारा धरण बांधण्यात आले. परंतु परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांना आजही सिंचनाची प्रतीक्षा आहे. झडशी भागातील शेतकऱ्यांना ओलिताकरिता बारा महिने पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता शासनाच्या वतीने १९८५-८६ दरम्यान झडशी परिसरातील रिधोरा गावाजवळ जंगल भागात पंचधारा नदीवर धरण बांधण्यात आले. इतकेच नव्हे तर जवळच असलेल्या बोरखेडी (कला) येथेही जंगलाच्या मध्यभागी दुसरे धरण उभारण्यात आले. दोन धरणे असतानाही झडशी परिसरातील केवळ निम्मा भागच सिंचनाखाली येतो. उर्वरित संपूर्ण पाणी वडगाव, सुरगाव, रेहकी, या गावातीलच शेतकऱ्याच्या ओलिता करिता जातो. त्यामुळे या परिसरात धरण असतानाही येथील शेतक ऱ्यांना योग्य प्रमाणात सिंचनाचा फायदा होत नसल्याची ओरड परिसरातील शेतकरी करीत आहे. या कालाव्याद्वारे रब्बी हंगामाकरिता सोडलेले पाणी कालवे ओव्हरफ्लो होऊन सरळ वेस्टेजच्या नालीद्वारे खैरी परिसरातील नाल्यावर निघून जाते. त्या नाल्याचे पाणी देखील रेहकी, सुरगाव, पवनार भागाकडे जात असल्याने येथील शेतकऱ्यांना फायदाच होतो. दरवर्षी पंचधारा नदीला भरपूर पाणी असते. यंदा मात्र ही पारिस्थिती नाही. त्यामुळे यंदा या परिसरातील विहिरींची पातळीही कमालीची खालावली आहे. झडशी परिसरातील काही शेतकऱ्यांनी उपकार्यालय सेलू येथील पाटबंधारे विभागाशी संपर्क करून शासकीय नियमाप्रमाणे पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी शासनाच्या नियमाने लागणारा कर आकारून जवळपास सत्तर-ऐंशी हजार रूपये भरावे लागतात असे अभियंत्यांद्वारे सांगितले जाते. सोबतच जिल्हाधिकारी यांची परवानगीआही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कालव्यातून सतत पाण्याचा अपव्यय होतो, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून तलाव तयार होतात त्याचेर काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहे. तसेच कालव्याद्वारे होणाऱ्या वेस्टेजच्या सहाय्याने नाल्यावर जाणाऱ्या पाण्याकरिता जिल्हाधिकाऱ्याची परवानगी नसावी का? त्याला कर का लागत नाही असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहे. धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी सतत करीत आहेत. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याचा प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देत पाणी सोडण्यास सांगावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहेत.(वार्ताहर)
रिधोरा धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडा
By admin | Updated: December 22, 2014 22:52 IST