देवळी : स्थानिक संजय इंडस्ट्रीज व जय बजरंग जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. दोन्ही जिनींगमध्ये दिवसभरात १ हजार ३०० क्विंटल कापसाची खरेदी करून ३ हजार ९६१ रूपये याप्रमाणे प्रति क्विंटल भाव देण्यात आला. सर्वप्रथम संजय इंडस्ट्रीज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते व फॅक्टरीचे मालक नेमीचंद घिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कपूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या जिनिंगमध्ये ८५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कास्तकार युनुसअली मोहम्मदअली पटेल यांचे कापूस गाडीने मुहूर्त करून जयंत शेंडे, शंकर रामगडे, अशोक सुरकार, सुरेश कामडी व चंदू बानकर आदी कास्तकारांचा टोपी, दुप्पटा व नारळ-पान देवून सन्मान करण्यात आला. जय बजरंग फॅक्टरीमध्ये जि.प. चे माजी उपाध्यक्ष संजय कामनापुरे यांचे हस्ते व फॅक्टरीचे मालक माणकचंद सुराणा यांचे उपस्थितीमध्ये खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी ४५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याप्रसंगी कापूस उत्पादक शेतकरी दिनेश बोरकर यांचे गाडीचे पुजन करून त्यांचा टोपी, दुप्पटा व नारळ-पान देवून सन्मान करण्यात आला. कापसाचा हंगाम सुरू होवून सुद्धा बऱ्याचशा कास्तकारांच्या घरी सीतादेवीचा सुद्धा कापूस न आल्यामुळे बाजारात चैतन्य नव्हते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या भावबाजीत प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रूपयांचा फरक असल्यामुळे उपस्थित कास्तकारांमध्ये नाराजीचा ऐकायला मिळत होता. यावेळी बाजार समितीचे सचिव लहू खोके, संचालक दिलीप तायवाडे, छितरमल वर्मा, शरद राऊत, प्रकाशचंद काँकरीया, विनोद घिया, महेश अग्रवाल, राकेश मोहता, संजय घिया, अमित सुराणा, पप्पू टावरी, अ. जब्बर तंवर, नरेश अग्रवाल व कास्तकारांची उपस्थित होती.(प्रतिनिधी)
देवळीत कापूस खरेदीचा शुभारंभ
By admin | Updated: October 30, 2014 22:55 IST