केळझर : येथील पद रिक्त असल्याने कोतवाल भरतीची लेखी परीक्षा २८ मे रोजी सेलू येथे पार पडली. सदर परीक्षेत मिळालेल्या गुणांवर परिक्षार्थ्यांनी शंका उपस्थित करीत फेरपरीक्षा घेण्याबाबत तहसीलदार सेलू यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदविला. यामुळे ही परीक्षाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केळझर साझात कोतवाल पदाची एक जागा रिक्त आहे. यासाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा शासन अध्यादेशानुसार घेण्यात आली नसल्याची लेखी तक्रार विनोद कैकाडी, सचिन खंडाळे, किशोर नखाते व विलास दांडेकर या परिक्षार्थ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबतही शंका आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता चौथा वर्ग असताना चौथ्या वर्गाचा शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका जोडणे बंधनकारक असताना दहावी व त्यावरील शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडल्याचे तक्रारीत नमूद केले. यामुळे परीक्षा शासनाच्या जीआरनुसार झाली नसल्याचा आरोपही उमेदवारांनी केला आहे.(वार्ताहर)
कोतवाल भरतीची परीक्षा वादाच्या भोवऱ्यात
By admin | Updated: June 3, 2016 02:10 IST