वर्ध : शासनाने जानेवारी २0१४ पासून जिल्ह्यातील ९0 हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे अलॉटमेंट बंद केले होते. यामुळे अन्न-धान्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केशरी शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारीवरून किसान अधिकार अभियानने २८ एप्रिल रोजी निवेदन सादर केले. राज्यभर याचे पडसाद उमटल्याने शासनाने केशरी कार्ड धारकांना देण्याचा निर्णय घेतला. केशरी शिधापत्रिकाधारकांना त्वरित धान्याचे अलॉटमेंट करा, अन्यथा आठ दिवसानंतर आंदोलन करू, असा इशारा किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी दिला होता. यानंतर पाठपुरावाही करण्यात आला. माध्यमांनीही हा विषय लावून धरला होता. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मे रोजी महाराष्ट्र शासनामार्फत प्रती कुटुंब पाच किलो धान्य वाटपाचे अलॉटमेंट करण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती दिली. शिवाय धान्याच्या आवश्यकतेप्रमाणे मागणी करण्यात आली व त्याप्रमाणे पैसेही भरण्यात आले असल्याचे त्यांनी किसान अधिकार अभियानला सांगितले. गव्हाच्या अलॉटमेंटचे आदेशही लवकरच येण्याची शक्यता सवाई यांनी व्यक्त केली. मागील चार महिन्यांपासून धान्य पुरवठा रखडलेल्या जिल्ह्यातील ९0 हजार शिधापत्रिकाधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. किसान अधिकार अभियानने आंदोलनाचा निर्णय मागे घेत झालेल्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, भाऊराव काकडे, प्रफुल्ल कुकडे, अशोक सूर्यवंशी, विनायक तेलरांधे, मनोहर दवळकर, गोपाल दुधाने, शेखर गुजरकर, विठ्ठल झाडे, गोविंदा पेटकर, संजय अवचट, एकनाथ बरबडीकर, वारलू मिलमिले, विलास बुरांडे, बाबाराव ठाकरे, किरण राऊत, जगदीश चरडे, अशोक काळे, मोहन ठाकरे, सुनील ठाकरे, विश्वनाथ खोंड, देशमुख, अश्विन येणकर, चंतपत चरडे, प्रकाश चावके, विनोद आवटकर यांनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणार धान्य
By admin | Updated: May 17, 2014 00:25 IST