वर्धा: शालेय पोषण आहार योजनेत कार्यरत पोषण आहार कर्मचारी व महिला बचत गटाकडे कायम ठेवण्याची मागणी करीत अखिल भारतीय शालेय पोषण आहार कर्मचारी फेडरेशनने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी शासनाच्या केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचाही निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाकाऱ्यांनी वैभव नावडकर यांनी स्वीकारले. राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शालेय पोषण आहार कर्मचारी गत १० ते १५ वर्षांपासून ग्रामीण व नगरपरिषद महानगरपालिकाच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत आहेत. या कामासोबतच शाळा उघडणे, शाळेची देखरेख करणे, स्वच्छता करणे हे काम निमुटपणे व प्रामाणिकपणे करीत आहेत; परंतु महिला सक्षमीकरणाचा डंका पिटणाऱ्या शासनाने शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून राज्यातील १ लाख ८० हजार महिलांना मिळालेल्या रोजगाराचा घास आता हिसकावून घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली (सेंट्रल किचन) मार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार देणार असल्याने कार्यरत पोषण आहार कर्मचारी व महिला बचत गटावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. यात मोजक्या ठेकेदारामार्फत आहार पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार युनियनच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवा, वेतन श्रेणी, कामाचा मोबदला आदी मागण्याही करण्यात आल्या. यावेळी आयटक राज्यसचिव दिलीप उटाणे, अध्यक्ष जयमाला बेलगे, सचिव रेखा नवले, आयटक जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, आयटक कार्याध्यक्ष गुणवंत डकरे, विनायक नन्होरे, वैशाली ठावरे, उषा उईके, माया देऊळकर, यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
पोषण आहार महिला बचत गटांकडेच ठेवा
By admin | Updated: May 3, 2016 02:36 IST