वर्धा : राज्यशासनाने २०१२-१३ च्या अध्याधेशानुसार खासगी शाळेत २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश मिळाण्याची तजवीज केली आहे. या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे अशी मागणी करीता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संबंधित विभागाला करण्यात आली. तसेच हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले. राज्य शासनाने २०१२-१३ च्या अध्यादेशानुसार खासगी शाळेत २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने खाजगी शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार इयत्ता पहिलीत किती टक्के गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात आला याची माहिती घेतली. यात २५ टक्के प्रवेश अनेक शाळेत झाले नसल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे खाजगी शाळा मनमानी करुन गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब पुढे आली. शिवाय शासकीय आदेशाचे उल्लंघन होत आहे. याकरिता समाजातील गरीब विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याची प्रशासनाने दखल घेत दहा दिवसांच्या आत महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश मिळण्याची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी झाली अथवा याची पाहणी करण्यात येईल अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला. शिष्टमंडळात विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर, उपाध्यक्ष राहुल सोरटे, मनविसेचे सेलू तालुका उपाध्यक्ष बबलु बोरकर, सेलु शहर अध्यक्ष करण पाठक, तालुका सचिव सोनु लांजेवार यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
खासगी शाळेत गरीब विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवा
By admin | Updated: July 8, 2014 23:38 IST