न्या. धर्माधिकारी : कस्तुरबा स्मृतिदिनानिमित्त ‘मातृदिन’ कार्यक्रम सेवाग्राम : गांधीजी कस्तुरबांना ‘बा’ तर बा गांधीजींना बापू या नावाने संबोधित होत्या. वास्तविक यात सामाजिक ब्रह्मचर्याचे मुल्य दडलेले आहे. यात कुठलाही सधर्म नव्हता. बा आश्रमात राहत होत्या; पण खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटीत संस्कृतीचे दर्शन होत होते. संस्कृतीच्या त्या प्रतिक होत्या, असे मत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. नई तालीम समितीच्या शांती भवनमध्ये ‘मातृदिन’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, चतुरा बहन, नफीसा आदी उपस्थित होते. मान्यवरांनी बा व बापू यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण केल्यानंतर सूतमाळ व खादी शॉल देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. न्या. धर्माधिकारी पूढे म्हणाले की, बा या बापूंच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनातच नव्हे तर विचार परिवर्तनाच्या लढाईत लढल्या. यातून समानतेचे मूल्य दोघांनीही रूजविले. बा पत्नी असल्या तरी त्या सहभागीनी होत्या. बा नसत्या तर गांधी नसते, हे समजावून घेतले पाहिजे. देशातच नव्हे तर जगात गांधीजींचे पुतळे उभारण्यात आले. काही ठिकाणी दोघांचेही आहे; पण यातून बा चे स्वतंत्र अस्तित्व दिसत नाही. गांधी १५० साजरा करायचा असेल तर माणूस आणि संस्थांनी समर्पण व एकमेकांना सोबत घेवूनच काम केले पाहिजे. राजकारण सत्तेत असते, संस्थांमध्ये नसावे. वर्धेतील संस्थांचे फेडरेशन व्हावे. ताळमेळ ठेवून कार्य करावे आणि न्यायालय मुक्त संस्था असाव्या, अशी भावना व्यक्त केली. युवकांनी खादीचे दोन वस्त्र शिवावे प्रत्येक युवकाने खादीचे दोन वस्त्र शिवावे. यातून एक कोटी लोकांना रोजगार मिळेल. महिला व बालकांचे शोषण होणार नाही. लग्नात हुंडा देऊ आणि घेऊ नका. मुलीचे कन्यादान करू नका, ती वस्तु नाही. गांधीजींनी चरखा, प्रार्थना व पूजा दिली. याचा खरा अर्थ समजावून घ्या. स्वत:चा मार्ग निवडून यशस्वी व्हा. जीवनात श्रमाला महत्त्व द्या. गांधी विचार व खादी वस्त्राचा संकल्प करा, असे आवाहनही न्या. धर्माधिकारी यांनी केले.
कस्तुरबा संस्कृतीच्या प्रतिक होत्या
By admin | Updated: February 23, 2017 00:47 IST