शासनाकडून मान्यता : २६ कोटी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आर्वी : केंद्र शासनाने निम्न वर्धा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सहभागी केला आहे. निम्न वर्धा प्रकल्पावरून मौजा बोरगाव (हातला), धनोडी (बहा.) सुक्ष्म सिंचन योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सुक्ष्म सिंचन योजनेसाठी २६ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून तालुक्यातील ४० गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राबाहेरच्या भागातील ४० गावांना शेतीसाठी सिंचनाच्या दृष्टीने हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. या योजनेसाठी निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यातून २४.०३ दलघमी इतके पाणी या प्रकल्पासाठी राखीव करण्यात आले आहे. तालुक्यातील ४० गावांतील ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांना सुक्ष्म सिंचनाद्वारे स्वयंचलित पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेसाठी निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलाशयातून २४.०३ दलघमी इतके पाणी धनोडी येथील कालव्यातून पंपाच्या साह्याने उचलून ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला बंदिस्त नलिकेद्वारे व सुक्ष्म सिंचनाद्वारे ०.४१ प्रती हेक्टर प्रमाणे देण्याचे नियोजन आहे. या सुक्ष्म सिंचनाद्वारे १ हेक्टरपर्यंत सिंचन करण्याची सुविधा करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. शिवाय शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम, पाणी वापर संस्थेची मुख्य इमारत, पंपगृहातील परिसरातील अंतर्गत रस्ते आदी कामांचे नियोजनही या प्रकल्पात राहणार आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करून घनमापन पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी वितरीत करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
सुक्ष्म सिंचन योजनेतून ४० गावांना सिंचन सुविधा
By admin | Updated: May 4, 2017 00:43 IST