सेवाग्राम : परिसरात धाम मुख्य कालव्याद्वारे सिंचनाची सोय करण्यात आली आहे. सिंचनासाठी पाणीही उपलब्ध आहे. परंतु अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्याने तसेच कालव्यात झुडपी वाढल्याने पाणी असूनही सिंचनाची बोंब, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाकाली व बोरधरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बरेच क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सेवाग्रामा भागात धाम मुख्य कालवा गेला आहे. या कालव्याद्वारे पिके ओलिताखाली आली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाला दुबार पीक घेणे शक्य झाले आहे. परंतु गत काही काळापासून या कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्या आहेत. या कारणाने सिंचन करताना अर्धेअधिक पाणी वाया जाते. सदर कालवा अंबानगर, कुटीकी फाटा, खरांगणा (गोडे), शिवनगर, हमदापूर आदी भागातून जातो. परंतु यातील अनेक भागात सध्या कालव्याचे पाणीच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या भगातील शेतकरी वर्गाला ओलित कसे करावे असा प्रश्न पडला आहे. याविपरित मधल्या काही भागात कालव्यात झुडुपे वाढल्याने या भागातील शेतांमध्ये पाणी साचत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. वायगाव, आलगाव, भोसा इ. शिवारात धरणाचे पाणी पोहोचतच नसल्याची ओरड य भागातील शेतकरी करीत आहे. हमदापूर येथे नाल्यावर बंधारा बांधण्यात आला आहे. येथे पाणीही मुबलक आहे. पण या बंधाऱ्यातून काढण्यात आलेल्या पाटसऱ्या जागोजागी फुटल्याने सर्वत्र पाणी वाया जात आहे. आलगाव फाटा, खरांगणा व शिवनगर आदी क्षेत्रातही हीच पाणी असूनही सिंचनाची बोंब अशी स्थिती आहे. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)
पाणी असूनही सिंचनाची बोंब
By admin | Updated: February 2, 2015 23:11 IST