कारंजा(घा.) : येथील नारा लगतच्या शिवारात असलेल्या गिट्टी खदानीत मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली असून या खड्ड्यात केव्हाही प्राणहानी होऊ शकते. १० वर्षापूर्वी तळेगाव ते कोंढाळी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम करीत असताना एका खासगी कंपनीने नारा रस्त्यालगतची ७ एकर शेती विकत घेऊन गिट्टी खदानीची निर्मिती केली. त्यात दगड उपलब्धतेसाठी ५० फुट खोल खड्डा खोदण्यात आला. ३० फुट पाणी आजही त्या खड्ड्यात आहे. या खड्ड्यातील दगड व अन्य खनिज ट्रॅक्टरद्वरे रॉयल्टी न देता नेले जात आहे. तहसील विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. कामकाज संपल्यानंतर या खड्ड्याच्या सभोवताल तारांचे कुंपन करण्यात आले होते. पण पश्चिमेकडील तार लंपास झाला. लगतचे शेतकरी उन्हाळ्यात येथील पाणी विद्युत पंपाने घेतात. खड्ड्यांचा बंदोबस्त न झाल्यास केव्हाही अनुचित घटना घडू शकते. या परिसराकडे सध्या कोणीही फिरकत नाही. ज्या कंपनीने शेत घेतले आहे, त्याच कंपनीला या खड्ड्यांचा बंदोबस्त करायचा आहे. कुठलाही अपघात होऊ नये यासाठी तात्पुरती व्यवस्था करून सभोवताल कुंपण घालणे गरजेचे आहे. पाण्याचा वापर करणाऱ्यांवर प्रतिबंध घालावा याकडे उपविभागीय अधिकारी आर्वी आणि तहसीलदार यांनी लक्ष पुरवून संबंधित कंपनीकडून खड्ड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)
खदानीतील खड्डा देतोय अपघातास निमंत्रण
By admin | Updated: July 31, 2016 00:53 IST