वर्धा : शहरात येऊन सतत चार वर्षांपासून घरफोड्या करून बेपत्ता होणाऱ्या अट्टल घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याजवळून शहरात झालेल्या चोऱ्यांतील हिरे व सोन्याच्या दागिन्यांसह एकूण १० लाख ८१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोरट्याचे नाव ओमप्रकाश उर्फ सोनू रंगनाथ खंडवे असे असून त्याने चोरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावणारा हनी गोविंदप्रसाद तिवारी (२३) व गोविंद गौरखेडे यालाही जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ आॅक्टोबर आणि १ नोव्हेंबरच्या रात्री दरम्यान प्रमोद पाटील यांच्या घराच्या मुख्य दाराचे बोल्ट काढून आंत प्रवेश करून घरातून संगणक आणि एक मारोती स्विफ्ट कार लंपास केली होती. या प्रकरणी शहर पोलिसात भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना येथील रेल्वे स्थानकावर ओमप्रकाश उर्फ सोनू रंगनाथ खंडवे (२५) रा़ सेमीनरी हिल्स व गोविंद गौरखेडे रा. कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक-सी-२, जी-४, नागपूर मुळ रा़ तुळशीनगर, दगडीपाण्याचे टाकीजवळ, बुलढाणा हे संशयित रित्या फिरताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने शहरात केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली. ओमप्रकाश खंडवे याने चोरीचा ऐवज त्याचा मित्र हनी गोविंदप्रसाद तिवारी (२३) रा़ कॉटन मार्केट चौक, नागपूर याला दोन लाखात आणि मोहम्मद कलीम वल्द मोहम्मद सुलतान (२४) रा़ तेलीपुरा, नागपूर याला चार हजारात विकला होता़ त्यांनी चोरीचा माल खरेदी केल्याने त्यांच्यावर कलम ४११ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ अटकेतील आरोपीतांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे़ पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक एम़डी़ चाटे, उदय बारवाल, जमादार अशोक वाट, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, समीर कडवे यांच्यासह महिला कर्मचारी शिल्पा राऊत व संचाली मुंगले यांनी केली.(प्रतिनिधी)
अट्टल घरफोड्या एलसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: November 8, 2014 01:34 IST